तुकोबाराय गुरुवारी यवत, तर शुक्रवारी वरवंड येथे मुक्कामी
दीड हजारांपेक्षा अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
यवत – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 15 जून रोजी दौंड तालुक्याचे हद्दीत प्रवेश करत आहे. पहिला मुक्काम यवत, तर 16 जूनला दुसरा मुक्काम वरवंड या ठिकाणी आहे. यावेळी पालखी सोबत असणाऱ्या भाविकांना आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी यवतकरांनी आणि वरवंडकरांनी मोठी जय्यत तयारी करून ही तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनकडून दिली जात आहे.
यवत येथील काळभैरवनाथ मंदिरात तुकोबाची पालखी मुक्कामी असते. यावेळी तालुका प्रशासनाबरोबरच यवत ग्रामपंचायत प्रशासन आणि संपूर्ण ग्रामस्थ या पालखी सोहळ्याच्या तयारीत गुंतलेले असतात. ग्रामस्थांकडून पालखी सोहळ्यासाठी दरवर्षी बेसन -भाकरीचे जेवणाची व्यवस्था काळभैरवनाथ मंदिराच्या भटारखाण्यात केली जाते. याची देखील व्यवस्था पूर्ण झाली आहे. गावातील बाजारातळ, शाळेच्या मैदानात आणि त्याचबरोबर गावात असणाऱ्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात दिंड्या आपला मुक्काम करतात. त्या जागांची स्वच्छता त्याचबरोबर तेथे दिवाबत्तीची सोय, महालक्ष्मी मंदिर काळभैरवनाथ मंदिर आणि पालखी मार्गांवर स्वागत कमानी यांच्यासोबत आकर्षक विद्युत रोषणाई ग्रामपंचायतकडून करण्यात आली असल्याची माहिती यवत ग्रामपंचायतचे सरपंच समीर दोरगे आणि ग्रामविकास अधिकारी बी. बी. चखाले आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.
पालखी सोहळा दौंड तालुक्यात प्रवेश करत असताना यवत पोलीस ठाणे यांचे हद्द सुरू होते. दोन दिवस दौंड तालुक्याच्या हद्दीत यवत पोलीस प्रशासनाला यवत आणि वरवंड आणि दौंड तालुक्याचे हद्दीपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन दिवस पोलिसांची कडेकोट बंदोबस्त असतो. पालखी सोहळ्यासोबत असणाऱ्या वारकरी आणि भाविकांना कोणत्याही प्रकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या अडचण येणार नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी यवत पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
यवत पोलिसांचा चोख बंदोबस्त
पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी यवत पोलीस ठाणे आणि प्रशासन सज्ज झाले असून 1 सहाय्यक पोलीस अधीक्षक, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 69 सहायक पोलीस निरीक्षक, 600हुन अधिक अंमलदार, 100 महिलांसह 600होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या, 2 दंगल नियंत्रक पथके. वरवंड येथील ए. सी. दिवेकर महाविद्यालयाचे एनसीसीचे 100 विद्यार्थी, 100 विशेष पोलीस अधिकारी असा सुमारे 1500 हून अधिक पोलीस आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवक संस्थेची पथके असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.
ग्रामपंचायत आणि प्रशासनाने केलेली तयारी
100 मोबाइल टॉयलेटची व्यवस्था, काळभैरवनाथ मंदिरालगत एकावेळी 300 मोबाइल चार्जिंगच्या सुविधा, पिण्याचे पाण्याचे टॅंकर भरण्याची व्यवस्था तीन ठिकाणी करण्यात आली असून शाम पवार, सोना कुदळे, रमेश बनसोडे यांच्या विहारी वरून मोफत टॅंकर भरण्याची व्यवस्था केली आहे. पालखी मार्ग आणि परिसरातील सर्व विहिरीमध्ये टीसीएल टाकून शुद्धीकरण करण्यात येत आहे. जागोजागी सहा ठिकाणी कचरा कुंड्यांची व्यवस्था केली आहे. एकावेळी हजार भाविक स्नान करू शकतील, अशी सोय (महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था) कालभैरवनाथ मंदिर व प्राथमिक शाळेत केली आहे. महिला भाविकांसाठी जागोजागी तात्पुरती मुतारीची सोय करण्यात आली आहे.