जागा बदलण्याची अवसरी ग्रामस्थांची मागणी
मंचर – अवसरी खुर्द येथील गुरुवारी भरणारा आठवडे बाजार गावातील मुख्य रस्त्यावर भरत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. ग्रामपंचायतीने आठवडे बाजाराची जागा बदलावी. अशी मागणी चालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
अवसरी खुर्द येथील साठ वर्षापासून दर गुरुवारी आठवडे बाजार चालू आहे. सुरुवातीला आठवडे बाजार ग्रामपंचायत पटांगणात भरत होता. आता एसटी स्टँड समोरील मुख्य बाजारपेठ रस्त्यावरच आठवडे बाजार भरत असल्याने गावातील भोरवाडी, इंदोरेवाडी तसेच बँक ऑफ बडोदा,
पतसंस्थेत येणार्या ग्राहकांना तसेच भैरवनाथ विद्यालयात शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांची आपली चार चाकी, दोन चाकी वाहने मंचर पारगाव रस्त्यालगत लावून गावात यावे लागत आहे. अनेक वेळा चारचाकी वाहनातील महागड्या वस्तू चोरीला गेल्या आहेत.
त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन आठवडे बाजाराची जागा अभंगमळा रोड – माऊली सायकल दुकानाच्या मागील रिकाम्या जागेत आठवडे बाजार भरवावा व बँका पतसंस्था व गावात येणार्या ग्राहकांची अडचण दूर करावी. अशी मागणी वाहन चालक, स्थानिक रहिवासी करत आहे.
अवसरी खुर्द येथील आठवडे बाजाराची जागा बदलण्यासाठी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. मराठी शाळेच्या पाठीमागील बाजूस असणार्या अभंग मळा रस्त्यावर जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच कार्यवाही केली जाईल.
-अनिल शिंदे, उपसरपंच अवसरी खुर्द