पुणे – कात्रज चौक ते खडीमशिन चौकापर्यंत रस्ता रूंदीकरण सुरू आहे. त्याची पाहणी करण्यासाठी अचानक आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणीदरम्यान थेट पर्यायी रस्ता तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी नारळ फोडत खडी मशिन चौक ते कान्हा हाॅटेलकडे येणारा २४ मीटर पर्यायी रस्ता सुरू करत वाहतूक कोंडीचा सामना करणार्या नागरिकांना मोठा दिलासा दिला.
हा पर्यायी रस्ता दि. १ जानेवारीपासून सुरू केला जाणार होता. त्यानुसार कामही पूर्ण झाले होते. मात्र, महापालिका आणि पोलिसांमध्ये समन्वय नसल्याने हा रस्ता अद्याप सुरू झालेला नव्हता. मात्र, शुक्रवारी पवार यांनी मनपा अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत थेट रस्ताच सुरू केला. दुपारी तीनच्या सुमारास आपण कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी करणार असल्याच्या सूचना पवार यांनी महापालिकेस दिल्या होत्या. त्यानुसार साडेपाच वाजता कात्रज चौकातून ही पाहणी केली जाणार होती.
वेळेनुसार, ५ वाजून ४० मिनिटांनी अजित पवार तेथे पोहचले. त्यानंतर त्यांनी कात्रज चौक, राजस चौक, कान्हा हाॅटेल चौक तसेच खडी मशिन चौकात पाहणी केली. यावेळी त्यांनी भूसंपादन तसेच निधी आणि कामाचा आढावा याची माहिती घेतली. या पहाणीवेळी पवार यांनी वंडरससिटी ते राजस चौकापर्यंत उभारण्यात येणार्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यासाठी केंद्राला तातडीनं डीपीआर पाठविण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.