खेड पोलिसांकडून 36 जणांवर गुन्हा दाखल
राजगुरूनगर, – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात पूजा करण्याच्या कारणावरून पुजाऱ्यांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. सोमवारी (दि. 16) घडलेल्या या प्रकारावरून दोन्ही बाजूच्या 36 पुजाऱ्यांवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे मंदिर आवारात पोलीस उपस्थित असताना हा प्रकार घडला आहे.
शंकर गंगाराम कौदरे (वय 65, रा. खरोशी, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 जणांविरोधात तर गोरक्ष यशवंत कौदरे (वय 40, रा. भीमाशंकर) यांच्या तक्रारीवरून विरोधी गटातल्या 15 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर गाभारा तसेच परिसरात असलेल्या शनिमंदिरात पूजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये वाद आहेत.
सोमवारी दुपारी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असताना हा वाद व हाणामारीचा प्रकार घडला. एका गटाने जमावाने येऊन पुजेला बसलेल्या पुजाऱ्यांना जबरदस्तीने उठवून येथील ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लाठ्या काठ्या, लोखंडी पाइप तसेच खुर्च्या एकमेकांना मारून जखमी करण्यात आले. पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
चालू पुजेच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे तसेच जाणीवपूर्वक खोडसाळपणा करण्याचे काम केले जात आहे. सगळे लोक आमचेच आहेत. सामोपचाराने तोडगा काढण्यात येईल; मात्र दांडगाई खपवून घेतली जाणार नाही.
-ऍड. सुरेश कौदरे,
अध्यक्ष भीमाशंकर देवस्थान