आळेफाटा येथे अग्निशमन केंद्राची मागणी पुन्हा ऐरणीवर
बेल्हे – आळेफाटा (ता. जुन्नर) येथे गुरूवारी (दि. 23) मध्यरात्रीनंतर सूर्यकांत शिंदे यांच्या मालकीच्या ट्रकने (एमएच 14 ईएम 9527) अचानक पेट घेतला. यात हा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
ही मालवाहू गाडी 23 नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास राजू बेळगावकर यांच्या गॅरेजमध्ये उभी करण्यात आलेली होती. रात्री दोनच्या सुमारास गाडीने पेट घेतल्याच्या नंतर गॅरेज व्यावसायिक यांनी तात्काळ धाव घेतली. पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय जुन्नर याठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचरण करण्यात आले;
मात्र अग्निशमन वाहन जुन्नरहून आळेफाटाला पोहोचेपर्यंत मालवाहू ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडत जळून खाक झाला. आळेफाटामध्ये अग्निशमन दलाची स्वतंत्र व्यवस्था असली असती तर जळीत वाहनाची दुर्घटना टाळता आली असती.
आळेफाटा परिसरात गेल्या तीन वर्षांमधील ही पाचवी दुर्घटना असून आळेफाटा परिसरात मध्यवर्ती ठिकाण असल्याने अग्निशमन दलाची शासनामार्फत स्थापना व्हावी, अशी आग्रही मागणी आळेफाटा परिसरातील नागरिक करीत आहे.
आळेफाटा परिसरात स्वतंत्र अग्निशमन दलाची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे. पुढील काळात शासनामार्फत तातडीने अग्निशमन दलाची व्यवस्था न केल्यास मनसेमार्फत आंदोलन करण्यात येईल.
-सचिन गोपीनाथ गडगे, शहराध्यक्ष मनसे