भैरवनाथनगरमधील ग्रामस्थांचा इशारा : मूलभूत सुविधांची वाताहत
तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथनगरमधील ग्रामस्थांनी मूलभूत सुविधा पुरवा, अन्यथा ग्रामपंचायतीचा कर भरणार नाही. आगामी काळातील सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, समस्यांनी त्रासलेल्या संतप्त नागरिकांनी याबाबतचे निवेदन पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथनगरमधील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार तळेगाव ढमढेरे (भैरवनाथनगर) येथे 1977 मध्ये 100 घरांची आणि सुमारे 1 हजार लोकांची लोकवस्ती इंदिरा आवास घरकुल योजनेतून निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार लेखी निवेदने देऊनही अनेक वर्षांच्या विविध समस्या व मूलभूत सुविधांसाठी सतत पाठपुरावा करूनही अद्याप प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही.
भैरवनाथनगर ते तळेगाव ढमढेरे – शिक्रापूर या मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी येण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता मिळावा, सार्वजनिक पाणीपुरवठा मिळावा, सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाची सोय करावी, अंतर्गत रस्ता पक्का करावा, पथदिव्यांची व्यवस्था करावी आदी मागण्या व समस्या निवेदनात नमूद केल्या आहेत. भैरवनाथनगर ही वस्ती 1960 पासून शासकीय गायरान गट क्रमांक 4175/1 अ/2 अ येथे वसली आहे. लोकवस्तीत अनेक जाती – धर्माचे लोक राहतात.
समस्यांबाबत ग्रामपंचायतीला वारंवार तक्रारी करूनही अद्याप प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. भैरवनाथनगर ते शिक्रापूर तळेगाव ढमढेरे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचा ठराव मंजूर होऊनही प्रशासनाने सतत दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे प्रशासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना येथील नागरिकांमध्ये आहे. तक्रारी अर्जाचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून योग्य न्याय द्यावा; अन्यथा कोणताही कर भरणार नाही.
पुढील सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासनाला दिली आहे.
लवकरच कार्यवाही करणार- भुजबळ
सरपंच अंकिता भुजबळ म्हणाल्या की, भैरवनाथनगर मधील लोकांना तळेगाव ढमढेरे ते शिक्रापूर या मुख्य रस्त्याला माळी मळा फाट्याजवळ ये जा करण्यासाठी याच गायरान जमिनीतून 20 फुटी रस्ता पूर्वीपासून पारंपारिक वहिवाटीचा आहे. या संबंधातील 7/12 उतारे व ग्रामपंचायतीचे 8 अ उतारे उपलब्ध आहेत. म्हणून त्यांना मुख्य रस्त्याला ये- जा करण्यास तो रस्ता कायमस्वरूपी देण्यास कोणतीही हरकत नाही. असा ठराव सर्वानुमते दि. 20 ऑक्टोबर 2021 च्या ग्रामसभेत मंजूर केला आहे. त्यानुसार कार्यवाही होईल.