पुणे -सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर सुरू असताना, एसटी महामंडळ त्यात काहीसे पिछाडीवर आहे. सरकारी पातळवरील अनास्था याला कारणीभूत ठरते आहे. पण, स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यातूनही मार्ग काढत प्रवाशांना सुविधा पुरवताना दिसून येतात. असाच प्रयत्न पुण्यातील शिवाजीनगर (वाकडेवाडी) आगारात केला जात आहे.
प्रवाशांना एसटी स्थानकाबाबतची माहिती कोठेही पाहता यासाठी शिवाजीनगर आगाराने काही क्यूआर कोड (क्विक रिस्पॉन्स कोड) प्रसारित केले आहेत. यात ज्या सुविधेबाबत माहिती हवी आहे, त्या “क्यूआर कोड’वर प्रेस करायचे. तेथे शेअरच्या चिन्हावर क्लिक करून तो गुगलला शेअर करायचा. त्यावर लिंक येईल. तेथे क्लिक केल्यावर आवश्यक ती सर्व माहिती मिळेल. सध्या शिवाजीनगर आगारात “स्वच्छ आगार, सुंदर आगार’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत ही क्यूआर कोड सुविधा सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.