व्यसनी मुलाची येरवडा कारागृहात रवानगी
ओतूर – व्यसनी मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच दोरीने बांधून व अंगावर डीझेल ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने ओतूर पोलिसांनी मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.
मंगेश विठ्ठल भोर (वय 30 रा. हिवरे बुद्रुक ता. जुन्नर) असे कोठडीत रवानगी केलेल्या मुलाचे नाव आहे. तर याबाबत त्याची आई विमल विठ्ठल भोर (वय 67) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, आई बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलगा मंगेश भोरने ओतूर पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, तपास करीत असताना बेपत्ता झालेल्या विमल भोर या आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर शनिवारी (दि. 15) ओतूर पोलिसांना मिळुन आल्या.
पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, मुलगा मंगेशला दारूचे व्यसन आहे. त्याचे लग्न होत नसल्याने तो सतत शिवीगाळ, दमदाटी व मारहाणी करीत असे त्याला कंटाळून घर सोडले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी (दि. 13) मुलाने बहिण सुनिता सुनिल कुटे हीला फोन केला असता तीने फोन उचलला नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या आईला शिवीगाळ तसेच पाठीत व कंबरेवर लाथा मारून तुला आज जिवंतच ठेवत नाही असे म्हणून जिवे मारण्याचे उद्देशाने नायलॉनचे दोरीने डावा पाय व दोन्ही हात बांधून कॅनमधील डीझेल आईच्या डोक्यावर व अंगावर ओतले.
घरात आगपेटी सापडत नसल्याने घराच्या पुढचे दरवाजाला बाहेरून कडी लावुन तो आगपेटी आणायला बाहेर गेला. नेमकी हीच संधी साधून आईने पळ काढल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील तपास ओतूचे सहयाक पोलीस निरीक्षक एस. व्ही. कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. सी. केरुरकर करीत आहेत.