पुणे – शहरात पावसाचा जोर वाढत असून, पुणे वेधशाळेने पुण्यात “रेड अलर्ट’ (अति मुसळधार) जारी केला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस शहरात मुसळधार पाऊस पडेल, तर दि. 20 ते 22 जुलैदरम्यान शहरात जोरदार (ऑरेंज अलर्ट) पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात गेल्या 24 तासांत मध्यम, तर काही भागांत रिमझिम पाऊस झाला. धरणक्षेत्रांतही मध्यम पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह आसपासच्या परिसरात मुसळधार तर काही भागात जोरदार पाऊस पडेल. त्यानंतरचे पुढील तीन दिवस शहरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी यासह झाड, भिंत पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी मुसळधार पावसात घराबाहेर पडू नये. झाडाखाली किंवा जुन्या भिंतीजवळ उभे राहू नये. विद्युत उपकरणांपासून लांब रहावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
घाटमाथ्यांवर धुव्वाधार; ताम्हिणी घाट, लोणावळ्यात 200 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस
गेल्या 24 तासांत ताम्हिणी, लोणावळा, खोपोली आणि धावडी घाटमाथ्यावर सर्वाधिक 200 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. खोपोली येथे सर्वाधिक 215, ताम्हिणी घाटात 210 तर लोणावळा येथे 208 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच शिरगाव-168, वळवण-138, अंबवणे-160, भिवपुरी-115, धावडी-184, डुंगरवाडी-180, कोयना-133, खोपोली-215, खंद-97, ताम्हिणी-210, भिरा-134, धारावी-118 मि.मी. पाऊस झाला.