भाजप युवा मोर्चाकडून आरोपाच्या फैरी : अधिकाऱ्यांशी खडाजंगी
बारामती – प्रशासकीय भवन समोर झालेल्या अपघातात तेजस विजय कासवे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अपघात स्थळावरच्या दुभाजकामधील झाडांची छाटणी केली, परंतु अपघात स्थळावरचा खड्डा मात्र अजूनही जैसे-थे आहे. यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बांधकाम व उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून मुख्याधिकारी, आरटीओ, महसूल, पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.
भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हा सरचिटणीस वैभव सोलनकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे केली.
यावेळी वैभव सोलनकर, जगदीश कोळेकर, विधीज्ञ ज्ञानेश्वर माने यांची मुख्याधिकाऱ्यांसोबत खडाजंगी झाली. अपघात स्थळे, दुभाजकामधील झाडे, मोकाट जनावरे, खड्डे यावर फैरी झडल्या. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते. युवा मोर्चाच्यां जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे यांना संबंधितांना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी सूरज खोमणे, अनिकेत कासवे, नेमाजी वायसे, विशाल पवार, मयूर अक्षय देवकाते उपस्थित होते.
पोलीस प्रशासन, परिवहन विभाग, महसूल विभाग यांनी संयुक्त बैठक आयोजित करून सर्व हायवा चालक-मालकांची बैठक तात्काळ घ्यावी व यामध्ये विविध नियमांची माहिती देऊन त्याची कठोर अंमलबजावणी करावी.
– वैभव सोलनकर, सरचिटणीस, भाजप, युवा मोर्चा.