वीस दिवसांच्या उपचारानंतर डॉक्टरांच्या टीमला यश : बारामतीतील घटना
जळोची – कीटकनाशक प्राशन केलेल्या एका बारा वर्षे मुलाला वीस दिवसांच्या अथक परिश्रमानंतर त्याचा जीव वाचविण्यात बारामतीतील डॉक्टरांना यश आले. अधिक प्रमाणात विषारी औषध घेऊनही मुलाचा जीव वाचल्याने मुलासह आई-वडिलांना डॉक्टरांच्या रूपात देवाचा साक्षात्कार झाला.
बारामती तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असणाऱ्या एका कुटुंबातील बारा वर्षीय मुलाने बहिणीची चेष्टा करत तिला कोंडल्याने त्याच्यावर आई-वडील रागावले. त्या रागातून मुलाने विषारी औषध प्राशन केले होते. त्याला बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे बालरोग तज्ज्ञ डॉ. भास्कर जेधे, अति दक्षता विभाग प्रमुख डॉ. निधी महाडिक इतर सहकारी डॉक्टर व परिचारकांनी त्याच्यावर उपचार केले. वीस दिवसांच्या प्रयत्नानंतर प्राण वाचवले.
अतिशय हलाखीची परिस्थिती असणाऱ्या या मुलाच्या आई-वडिलांनी त्याला तोंडातून फेस व बेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णालयात घेऊन आले. परिस्थिती बघता डॉक्टरांनी तात्काळ मुलाच्या बचावासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, मुलाची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी आई-वडिलांना मुलाच्या बचावाची शक्यता कमी असल्याचे सांगितले.
यावर आईने काकुळतीला येत काही पण करा पण माझ्या मुलाला वाचवा, अशी काळीज पिळवटणारी भावना डॉक्टरांसमोर व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी मुलाच्या उपचारासाठी पैसे आणायचे कुठून हाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. एकंदरीत मुलाची व त्याच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहून डॉक्टरांनी उपचारात सवलती दिल्या. गावातील लोकांनाही सहकार्य केले. शासकीय योजनेचाही लाभ मिळवून देण्यासाठी दवाखान्याने पुढाकार घेतला.
डॉक्टर जेधे, सहकारी डॉक्टरांनी तसेच रुग्णालयाने माणुसकीचा वसा जपत वैद्यकीय खर्चाकडे न पाहता मुलाचा जीव वाचवला. दुसऱ्या जिल्ह्यातून उपजीविकेसाठी बारामतीत वास्तव्यास असलेल्या या कुटुंबाला माणुसकीचे तर दर्शन झालेच झाले. मात्र, देवाच्या रूपात त्यांना साक्षात्कार झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉक्टरांनी व रुग्णालयाने मुलाचा जीव वाचवून दाखवलेल्या माणुसकीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे. मात्र अशा घटना घडू नयेत याची काळजी घेत त्याबाबत समाजात जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. जेधे यांनी सांगितले.