मंचर/अवसरी -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द गावामध्ये गेल्या आठवड्याभरात 50 पेक्षा अधिक रुग्ण सापडले असून, तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण या भागात सापडत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव त्वरीत रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उद्योजक प्रशांत अभंग यांनी केली आहे.
अवसरी खुर्द गावात (ता. आंबेगाव) येथे गेल्या आठवड्याभरात 50 पेक्षा अधिक रुग्ण सापडले असून, दोन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अवसरी खुर्द गावात 4 ते 5 मंगल कार्यालये असून, लग्नानिमित्त कार्यालयामध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. तूर्त आठवडे बाजार बंद केला असला तरी 15 दिवसांपूर्वी आठवडे बाजारासाठी आलेले व्यापारी विविध गावांत फिरत असतात. त्यांची करोना तपासणी केली जात नाही, तसेच दशक्रिया आणि अंत्यविधीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
अवसरी खुर्द, गावडेवाडी, पारगाव, मेंगडेवाडी, लाखणगाव आदी गावांमध्ये करोनाबाधित रुग्ण संख्या वाढत आहे. अवसरी खुर्द गावात दररोज 4 ते 5 पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यातील काही रुग्ण पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी प्रशासनाने अवसरी खुर्द गावात गर्दी टाळण्यासाठी जागरूकपणे काम करून करोनाला अटकाव होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यात नवीन 27 रुग्ण
आंबेगाव तालुक्यात नवीन 27 करोनाबाधित रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या 4 हजार 381 झाली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली. अवसरी खुर्द 9, लांडेवाडी 8, मंचर 3, नागापुर 2, चास, लोणी, भराडी,पारगाव, घोडेगाव प्रत्येकी एक असे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 113 रुग्णांचा मृत्यू झाला असून 163 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली.