पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय


विकसित भाग पिंपरी-चिंचवड महापालिकेत तर अविकसित भागाचा होणार पीएमआरडीएत समावेश

पुणे – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनडीटीए) विकसित असलेला भाग हा पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये तर अविकसित असलेला भाग हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत समाविष्ट करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पीसीएनडीटीएचे विलीनीकरण करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून पीएमआरडीएची तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेची हद्द विस्तारणार आहे.

मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पीएमआरडीएची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा समावेश पीएमआरडीएमध्ये करण्याबाबत चर्चा सुरू होती. गुरुवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये पीसीएनडीटीए विलीनीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यास मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मकता दर्शविली.

तसेच, या निर्णयास मान्यता दिली. पीसीनडीटीए हद्दीतील विकसित असलेला भाग हा पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये तर अविकसित असलेला भाग हा पीएमआरडीएच्या हद्दीत समावेश करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार नगरविकास विभागाच्या सचिवांनी याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या आहेत, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने तेथे काम करणाऱ्या कामगारांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, कारखान्याजवळच त्यांच्या निवासाची सोय होणे आवश्‍यक होते. याबाबी विचारात घेऊन पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना 14 मार्च 1972 रोजी करण्यात आली.

मागणीला यश
पीएमआरडीएची स्थापना झाल्यावर एकाच भागात दोन प्राधिकरणे कशासाठी, असा सवाल करण्यात आला होता. त्यानुसार “लवासा’ या हिल स्टेशनला असलेला विशेष प्राधिकरणाचा दर्जा मागील दोन वर्षांपूर्वी रद्द करण्यात आला होता. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे विलीनीकरण पीएमआरडीएमध्ये करणे अपेक्षित होते. मागील काही वर्षांपासून याबाबत पाठपुरावा सुरू होता, त्यास आता यश मिळाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.