25 पैकी अजूनही 11 शाळा शून्य शिक्षकी
राजगुरुनगर – खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात 5 विस्तार अधिकारी 35 केंद्रप्रमुख व 45 मुख्याध्यापकांसह 289 शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली.
खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात अनेक पदे अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा परिणाम होत आहे. खेड तालुक्यात 402 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत 36 हजार 276 घेत आहेत. 402 शाळांमध्ये 1652 शिक्षकांची मजूर पदे आहेत त्यापैकी 1363 शिक्षक कार्यरत आहेत. पहिली ते चौथीपर्यंत 294 शाळा असून सातवीपर्यंत 128 शाळा आहेत.
मध्यंतरी शिक्षक बदल्यांमुळे अनेक शाळा शून्य शिक्षकी शाळा झाल्या होत्या. त्यात खेड पश्चिम भागातील शाळांचे प्रमाण अधिक होते. 25 पैकी अजूनही 11 शाळा शून्य शिक्षकी शाळा आहेत. शून्य शिक्षकी शाळांमध्ये निवृत्त झालेल्या शिक्षकांची 20 हजार रुपये मानधनावर नियुक्ती करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता खेड तालुक्यात 850 निवृत्त शिक्षक आहेत त्या पैकी केवळ 24 निवृत्त शिक्षकांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
या योजनेसाठी पुणे जिल्हा परिषदेकडे एकूण निवृत्त शिक्षकांपैकी 99अर्ज आले त्यात खेड तालुका पहिल्या क्रमांकावर आहे. निवृत्त शिक्षक भरती झाल्यास खेड तालुक्यात शून्य शिक्षकी शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होणार आहेत.
गुणवत्तेचा प्रश्न निर्माण
खेड तालुक्यात शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यातूनही जे आहेत त्यापैकी काही जण शिक्षण विभागातील कामांसाठी खेड पंचायत समितीमध्ये काम करीत असतात. त्यामुळे त्यांची जेथे नियुक्ती आहे त्या केंद्रात बिटात गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विस्तार अधिकारी, केंद्र अधिकारी यांनी प्रत्यक्ष शाळेत जावून विद्यार्थ्यांसह मूलभूत समस्या प्रश्न जाणून घेत त्यांचा निपटारा करणे आवश्यक असताना काही विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख हे त्यांना नेमून दिलेल्या केंद्रात जात नसल्याने नाराजी आहे. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि विषयतज्ज्ञांनी शाळांवर भेटी देणे गरजेचे आहे.
गेली अनेक दिवस शिक्षण विभागात भरती झालेली नाही पदोन्नती रखडली असल्याने तालुक्यात 5 विस्तार अधिकारी, 35 केंद्र प्रमुख व 45मुख्याध्यापक पदे रिक्त आहेत.पदवीधर शिक्षकांकडे केंद्र प्रमुखणाचा पदभार देण्यात आला आहे.
– अमोल जंगले, गटशिक्षण अधिकारी, खेड