न्हावरे प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शिरूरच्या पुर्वभागात सर्वत्र “जनता कर्फ्यूला” नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला.
पूर्व भागातील न्हावरे, मांडवगण फराटा, वडगाव रासाई, इनामगाव, निमोणे, करडे, आलेगाव पागा, नागरगाव, रांजणगाव सांडस, आंबळे, उरळगाव, आंधळगाव, कुरुळी, निर्वी, शिरसगाव, चिंचणी, शिंदोडी या गावांच्या परिसरात सर्वत्र बाजारपेठा, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांनी आज घराबाहेर न जाता घरी राहणेच पसंद केले.
त्यामुळे जनतेमध्ये कोरोना विषाणू संसर्गाबाबात मोठ्या प्रमाणावर जागृती झाली असल्याचे चित्र शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे शिरूर-न्हावरे-चौफुला या राज्यमार्गावर सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शुकशुकाट पाहायला मिळाला.
तसेच कोकडेवाडी (ता.शिरूर)येथील विठ्ठल मंदिरात घंटानाद करून प्रशासन व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.