पुणे – शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर मोक्का व तडीपारीची कारवाई केली जात आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारताच आजवर तब्बल 37 टोळ्यांना मोक्का लावला. आता त्यांनी आपली नजर “रायझिंग स्टार्स’ म्हणजेच नव्याने तयार होणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगारांच्या टोळ्यांकडे वळवली आहे.
गुन्हे शाखेने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील “रायझिंग स्टार्स’ची कुंडली तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना समुपदेशन करून समजुतीचा डोस देण्यात येणार आहे. तरीही न सुधारल्यास थेट तडीपारी आणि मोक्कासारखी कारवाई केली जाणार आहे.
सराईत गुन्हेगार पोलिसांच्या कारवाईमुळे शांत असताना दुसरीकडे अल्पवयीन गुन्हेगारांची टोळीने शहरात उपद्रव माजवला आहे. मोठे गुंड सक्रिय नसल्याचा फायदा घेत हे स्वयंघोषीत दादा गल्लीबोळात कोयते घेत दहशत माजवत आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. तरुणांकडून भाईगिरी करण्यासाठी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
वाढदिवसाला तलवारीने केक कापणे, हातात शस्त्रास्त्र घेऊन नाचणे, व्हॉट्सऍप स्टेटसवर शस्त्रास्त्रांचे व्हिडिओ अपलोड करणे असे प्रकार वाढत आहेत. या सर्वांची पोलिसांनी यादी बनवली आहे. त्यानुसार गुन्हेगारीकडे झुकणाऱ्या अल्पवयीन मुलांना रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी सराईताच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या तरुणांवर कारवाई केली होती. त्याशिवाय कुख्यात गुंड गजानन मारणेच्या रॅलीत सहभागी झालेल्यांविरुद्धही कारवाईचा बडगा उगारला होता.
शहरात कार्यरत अल्पवयीन टोळ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. संबंधित टोळ्यातील गुन्हेगार हद्दपार करण्यात आले आहेत. याशिवाय काही तुरुंगात असून काही जामिनावर आहेत. दरम्यान, स्वत:च्या टोळ्या तयार करण्याची तयारीत असलेल्यांना आठवड्यातून एकदा पोलीस ठाण्यामध्ये बोलावून हजेरी घेतली जात आहे.
शहरातील समर्थ पोलीस ठाण्यांतर्गत “रायझिंग स्टार्स’च्या तीन टोळ्या कार्यरत आहेत. त्याशिवाय भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांतर्गत तीन, वारजे माळवाडी दोन, कोथरूड दोन, दत्तवाडी चार, येरवडा आणि हडपसर तीन, सिंहगड रोड, खडकी, वानवडी आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक टोळी कार्यरत आहे.
“गुंडांना प्रेरणास्थान मानणारे काहीजण नवीन गुन्हेगारी टोळी तयार करण्याच्या तयारीत होते. त्यानुसार संबंधितांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन “राइजिंग स्टार्स’ची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत यादी पाठवून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय गुन्हेगारीकडे कल असलेल्या अल्पवयीन मुलांचे भरोसा सेलच्या माध्यमातून समुपदेशन केले जात आहे.” – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर