मारुती कंपनीच्या कार महागणार

नवी दिल्ली – महागाई वाढल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर रुपयाचे अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात कारच्या दरात वाढ करण्याची शक्‍यता मारुती सुझुकी कंपनीने व्यक्त केली.

कंपनीने या अगोदर एप्रिल महिन्यातही कारच्या दरात वाढ केली होती. विविध धातू, पोलाद इत्यादीचे दर वाढत आहेत. अगोदरच दरवाढ करण्याची गरज होती. मात्र परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही वाट पाहिली. मात्र आता दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही असे कंपनीचे संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले.

ते म्हणाले की, पोलादाची किंमत 38 रुपये प्रति किलोवरून 68 रुपये प्रति किलो झाली आहे. त्याचबरोबर रोडियम नावाच्या धातूची किंमत 19 हजार रुपये प्रति ग्रॅम वरून 66 हजार रुपये प्रति ग्रॅम इतकी झाली आहे. या धातूंच्या किमती कमी होण्याची शक्‍यता अजिबात दिसत नाही. त्यामुळे दरवाढ करावी लागणार आहे.

कंपनी नेमकी किती दरवाढ करायची या संदर्भातील हिशोब करीत आहे. मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. कंपनीने दरात वाढ केल्यानंतर इतर कंपन्या ही दरवाढ करीत असतात. गेल्या आठवड्यात किरकोळ आणि घाऊक महागाई वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये इतर सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.