पुणे – माथाडी कामगार असल्याचे सांगत एका व्यवसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथक दोनने सापळा रचून अटक केली. खंडणीची तीन हजाराची रक्कम घेताना त्यांना पकडण्यात आले. दोघेही आरोपी माथाडी कामगार असून कोणत्या संघटनेशी संलग्न आहेत याचा तपास केला जात आहे. इफराज फिरोज शेख (30 रा. जयप्रकाश नगर, माऊली प्रेव्हीजन जनरल स्टोअर्स शेजारी ( येरवडा ) आणि तुषार विष्णु आढवडे (36 रा. लक्ष्मीनगर, येरवडा ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी हे विमाननगर परिसरात चहा, कॉफी मटेरियल पुरवितात. त्यांच्या कामगारांची गाडी विक फिल्ड बिल्डींगच्या आऊट गेट समोर, विमनामनगर येथे अडवण्यात आली होती. त्यांना आसिफ ऊर्फ बबलु युसुफ खान, इफराज फिरोज शेख व इतरांनी आम्ही माथाडी कामगार आहोत, आम्ही माथाडीचे कोणतेही काम करणार नाही, परंतु तुला आम्हाला प्रत्येक ट्रिप मागे 500 रुपये दयावे लागतील, तु जो पर्यंत पैसे देणार नाही, तो पर्यन्त तुझी गाडी आत जावु देणार नाही अशी धमकी दिली होती. वेळोवेळी त्यांची आडवणूक करुन,त्यांना त्रास देवून त्यांचेकडे प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये दयावे लागतील अशी खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्यानूसार पोलिसांनी बुधवारी विक फिल्ड बिल्डींगच्या आऊट गेट समोर सापळा रचला होता. त्यानूसार फिर्यादी यांचेकडून तीन हजार रुपये स्विकारत असताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुध्द येरवडा पोलीस ठाण्यता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद सालुंके, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, प्रविण पडवळ, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, प्रदिप चव्हाण, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.