पुणे, दि. 13 -पुणे शहरात रविवारी सकाळी राज्यातील नीचांकी 13.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे रविवारी पुणे राज्यातील सर्वांत थंड शहर ठरले. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस किमान तापमानात वाढ होणार नसून, बुधवारनंतर मात्र किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
राज्यात यावर्षी मान्सून लांबल्याने “ऑक्टोबर हीट’चा कोणताही परिणाम जाणवला नाही. राज्यात ऑक्टोबरमध्ये कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली नाही. तसेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच गारवा वाढला होता. पुणे शहर आणि परिसरात 30 ऑक्टोबर रोजी यंदाच्या हंगामातील नीचांकी 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. याच दिवशी यंदाच्या हंगामातील राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी पुण्यात 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवारी पुण्यात 13.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी सलग तिसऱ्या दिवशीही 13.3 अंश सेल्सिअस किमान तापमान राज्यातील नीचांकी तापमान ठरले. शहरात कमाल 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पश्चिम हिमालयात आणि उत्तराखंडमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टी झाली आहे. तसेच बुधवार (दि. 16) पर्यंत आग्नेय बंगाल उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिणेकडील काही राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असली तरी राज्यात पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यातील दक्षिण भागात अंशत: ढगाळ वातावरण तयार होणार शक्यता आहे. ईशान्य मान्सून पाऊस आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा याचा एकत्रित परिणाम होणार असून, चार दिवसांत किमान तापमानात किंचित घट होईल.