शिक्रापूर हद्दीत चार घटना : पुण्यातील सावकारांचा शिरकाव
शेरखान शेख
शिक्रापूर : औद्योगिकीकरण, नागरिकीकरण, कृषी क्षेत्राने समृद्ध झालेल्या शिरूर तालुक्यात सावकारकीचा फास आवळत आहे. गेल्या वर्षभरात सावकारीतून छळवाद, अपहरणाच्या घटनांचा आलेखाने समाजमन दूषित होत आहे. शिक्रापूर हद्दीत सावकारकीतून सर्वसामान्य वेठीस धरले जात आहेत. गेल्या अकरा महिन्यांत पोलीस दप्तरी चार तक्रारी दाखल आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होत असल्याने हा फास रोखण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या बेकायदेशीर सावकारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातून सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्याला फास लागून अनेक लहान- मोठे गुन्हे घडले आहेत. मोकाट सावकारीला आवर घालणे प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वारंवार बेकायदेशीर सावकारीच्या घटना घडत आहेत.
काही ठिकाणी सावकारीचे प्रकार विकोपाला गेले आहेत. शिक्रापूर हद्दीमध्ये अनेक गावांमध्ये काही ठिकाणी सावकारांनी नागरिकांना चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारून रकमा दिल्या आहेत. पैशांच्या मोबदल्यात सामान्यांच्या जमिनी, घरे, वाहने नावावर करुन घेतली आहेत. काही नागरिकांची जमीन व घरे परस्पर विक्री केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. यापूर्वी सावकारांबाबतच्या काही तक्रारी थेट मंत्रालयात पोहोचल्याच्या घटना आहेत. व्याजाने पैसे देत सावकारी करणाऱ्यांमध्ये काही शासकीय अधिकाऱ्यांचा देखील समावेश यापूर्वी उघड झाला आहे.
सध्या शिक्रापूर हद्दीत एका गावच्या सध्याच्या सरपंचाने नागरिकांचे कोरे मुद्रांक, धनादेश लिहून घेऊन अनेक व्यवहार केल्याचे निदर्शनास आले. एका गावातील बड्या व्यक्तीने व्याजाच्या पैशासाठी लहान व्यावसायिकाचे अपहरण केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. गुन्हे दाखल झाले आहेत. आठवड्यात शिक्रापूर येथे एका हॉटेल व्यावसायिकाने एका सावकाराने व्याजाच्या पैशासाठी दमदाटी केल्याचे तर एका युवकाने व्याजाच्या पैशासाठी महिलेची जमीन नावावर करुन घेत फसवणूक केली आहे.बेकायदेशीर सावकारांमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. भविष्यात सावकारकीचा फास आवळला तर प्रशासनापुढे आव्हान निर्माण होणार आहे.
अकरा महिन्यांत चार घटना
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमधील (दि.11) नोव्हेंबर रोजी सागर सासवडे, (दि.9) रोजी अहजर सय्यद, (दि.30) ऑगस्ट रोजी अनिल ढमढेरे यांच्यावर तर जातेगाव बुद्रुकचे सरपंच किशोर खळदकर यांच्यावर (दि.1) फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांत सावकारी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तर व्यतिरिक्त अनेक सावकारांविरोधात काही नागरिकांनी तक्रारी केलेल्या असून काही तक्रारींच्या चौकशा सुरु आहेत. पोलीस डायरीतील नोंदीनुसार या चार घटना असल्या तरी अनेक तक्रारी भीतीपोटी दाखल होत नाहीत. हे भीषण वास्तव आहे.
नागरिकांनी बिनधास्त तक्रार करावी
शिरूरचे सहायक निबंधक शंकर कुंभार म्हणाले की, खासगी सावकारांबाबत नागरिकांनी आमच्या सहायक निबंधक कार्यालयाकडे तक्रार केल्यास आम्ही चौकशी करुन बेकायदेशीपणे काम करणाऱ्या लोकांवर तातडीने गुन्हे दाखल करु. त्यामुळे नागरिकांनी व्यथित न होता न घाबरता आमच्या कार्यालयाकडे तक्रारी कराव्यात.
सावकारांची दमबाजी व दडपशाही
सावकार हे नागरिकांना पैशासाठी काहीही कर, जमीन विक, गाडी विक, बायकोचे दागिने विक, सालाने रहा, मात्र माझे पैसे दे, तू कोणाकडे गेला तरी काही फायदा होणार नाही. माझी खूप लांब ओळख आहे, माझे काही होणार नाही, अशी धमकी देत नागरिकांना दमबाजी करीत नागरिकांच्या काही वस्तू देखील जप्त करुन दहशत माजवत आहेत. त्यामुळे अनेक गरजू हतबल झाले आहेत.
नागरिकांनी न घाबरता तक्रार द्यावी
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे म्हणाले की, शिक्रापूर हद्दीमध्ये काही ठिकाणी बेकायदेशीर सावकार नागरिकांना व व्यवसायिकांना त्रास देत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र, सावकारांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यास समोर येत नाहीत. मात्र, नागरिकांनी न घाबरता बिनधास्तपणे तक्रार देण्यास पुढे यावे. सावकारांना कायद्याचा बगडा दाखवला जाईल.