पुणे (पांडुरंग मरगजे) :- ऑडॅक्स क्लब पॅरिसियन आयोजित पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस (पीबीपी) या जागतिक सायकल स्पर्धेत पुण्याच्या सायकलपटूंनी उत्तुंग यश मिळत फ्रान्समध्ये भारताचा डंका वाजवला आहे. डॉ. ओंकार थोपटे, गगन ग्रोव्हर आणि अंजली भालिंगे यांनी निर्धारित वेळेत ही आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण केली.
पॅरिसमध्ये झालेल्या रॅन्डोनिअर या 1220 किमी ब्रेव्हेट स्पर्धेत जगभरातून आठ हजार तर भारतातून 280 सायकलपटू सहभागी झाले होते. ही 1220 किलोमीटरची सायकल स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 90 तासांत पूर्ण करायची असते.
पुण्याचे अल्ट्रा सायकलपटू हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ओंकार थोपटे यांनी 89 तास 22 मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण करुन इतिहास रचला. लंडन-एडिनबर्ग-लंडन ही स्पर्धा 2022 मध्ये आणि पीबीपी ही स्पर्धा 2023 या लागोपाठ वर्षी पूर्ण केलेले ते एकमेव भारतीय डॉक्टर आहेत.
ट्रायऍथलीट गगन ग्रोव्हर यांनी ही स्पर्धा 86 तास 10 मिनिटांत तर पुणे राण्डोनर्सच्या महिला सायक्लिस्ट अंजली भालिंगे यांनी 88 तासात ही स्पर्धा पूर्ण करुन पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सूरज मुंढे, किरीट कोकजे, संतोष बिजुर, अक्षय जोशी आणि दिनेश मराठे यांनी दिलेल्या वेळेबाहेर ही स्पर्धा पूर्ण केली.
या स्पर्धेत डॉ. लीना पाटणकर यांनी 1100 किमी अंतर पूर्ण केले. झोपेच्या समस्येमुळे त्यांना ही स्पर्धा सोडावी लागली. आशिष जोशी यांनी ब्रेस्टपासून पॅरिसपर्यंतचे अर्धे अंतर पार केले. पण गुडघ्याची सूज वाढल्याने त्यांनाही स्पर्धा सोडावी लागली. तर चंद्रकांत बारबोले यांना मानेच्या प्रचंड दुखण्यामुळे ही स्पर्धा सोडावी लागली.
या अष्टपैलू सायकलपटूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले व भारताचा तिरंगा पॅरिसमध्ये अभिमानाने फडकवला. त्याबद्दल पुणे राण्डोनर्सच्या सदस्यांनी एकच जल्लोष केला. तसेच हा आनंद पुणे राण्डोनर्सच्या सदस्यांनी केक कापून साजरा केला.
स्पर्धा असते खूप कठिण…
लंडन-एडिनबर्ग-लंडन ह्या सायकल स्पर्धेत अवघे 90 तास 1220 किमी पार करण्यात दिलेले असतात आणि डोंगरदऱ्यातून, घाटातून, विषम हवामानात रात्री थंडी, तर दिवसा प्रचंड ऊन, भारतीय खाण्याची गैरसोय आणि अपुरी झोप या गोष्टींचा सामना करत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. शेवटच्या दिवशी सायकलस्वारांना उलटे वारे आणि प्रचंड पाऊसाचा सामना करावा लागला.