पुणे – चितळे बंधू मिठाईवाल्यांकडे भेसळीचा आरोप करून 20 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका शिक्षिकेसह चौघांना गुन्हे शाखेने पकडले. याप्रकरणी एका इंग्रजी शाळेच्या शिक्षिकेसह सुनील बेनी परदेशी (वय 49), करण सुनील परदेशी (वय 22), अक्षय मनोज कार्तिक (वय 30, रा. घोरपडे पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सुनील आणि करण यांचा लॉंड्रीचा व्यवसाय आहे. शिक्षिकेस दुधात काळ्या रंगाचा पदार्थ आढळून आला असून ते भेसळ करण्यात आली आहे. तसेच, दूध खराब असल्याच्या ई-मेल शिक्षिकेने 2 जून रोजी दुग्ध व्यावसायिकाच्या ग्राहकाच्या तक्रार निवारण केंद्राकडे पाठविला होता. तुमच्याविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) आणि पोलिसांकडे तक्रार करते, अशी धमकी तिने दिले.
तुमची शहरातील दुकाने बंद करून, तुमची बदनामी करू, अशी धमकी तिने दिली होती. त्यानंतर तिने दुग्ध विक्री व्यावसायिकाकडे 20 लाखांची खंडणी मागितली होती. याबाबत व्यावसायिक कंपनीचे सहायक विपणन प्रतिनिधी नामदेव बाबूराव पवार (वय 62) यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे आणि महिला पोलीस अंमलदार मीना पिंजण यांनी सापळा लावून खंडणीची रक्कम स्वीकारताना चौघांना पकडले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कार्तिकविरोधात यापूर्वी वानवडी, मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सुनील आणि करण यांच्याविरोधातही गुन्हे दाखल आहेत.