नगर रस्त्यावर वाहने सुसाट, रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत
संदिप घोडके
येरवडा – नगर महामार्गावरील गुंजन चौक ते फिनिक्स माॅल पर्यंतचा बीआरटी मार्ग बुधवारी (दि.7 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास महापालिकेने काढुन टाकला. हा मार्ग काढताना अनेक ठिकाणी रस्ता दुभाजक तोडण्यात आल्याने आता मोकळी वाट मिळाल्याने वाहने सुसाट आडवी-तिडवी धावत आहेत. रस्ता चार पदरी झाल्याने वाहतूक कोंडी होत नसली तरी हा रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना मात्र जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
बीआरटी मार्ग उखडून १५ दिवसांत सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना येथे करण्यात आलेली नाही. नगर रस्त्यावर कोट्यवधींचा निधी खर्च करून बीआरटी मार्ग तयार करण्यात आला. परंतु, योग्य नियोजनाचा अभाव, नियमांची काटेकोर अंमलबजावणीची कमतरता आदी कारणांमुळे या मार्गात अपघातांसह वाहतूक कोंडी होऊ लागल्याने त्यातच मेट्रोच्या खांबांमुळे हा मार्ग अधिकच गुंतागुंतीचा ठरू लागल्याने तो काढून टाकण्याचा निर्णय घेत एक रात्रीच पालिकेच्या तत्पर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बीआरटी मार्ग उखडून टाकला. परंतु, हे काम करताना राडारोडा तसाच पडून आहे अनेक ठिकाणी दुभाजक तोडल्याने वाहने कोठुनही धावत आहेत.
शास्त्री नगर, आगाखान पॅलेस, रामवाडी पोलीस चौकी, नोवाटेल हाॅटेल,फिनिक्स माॅल य ठिकाणी पंक्चर तयार झाले असून ते बुजविणे गरजेचे आहे. वाहने विरुध्द दिशेनेही सुसाट जात आहेत. या मार्गावर स्पीड ब्रेकर बसविणे, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग तयार करणे, अशी कामे करणे गरजेचे ठरत आहे.
बोटाला जखम असताना हात कापण्याचा प्रकार पालिका प्रशासनाने नगर रस्ता बीआरटी मार्गाच्या प्रश्नात केला आहे. बीआरटी मार्ग काढल्याने रस्ता रुंद झाल्याने आता वाहने जोरात जात असल्याने पादचाऱ्यांना असुरक्षितता निर्माण झाली आहे.
– बाळासाहेब शिंगाडे, अध्यक्ष, मनसे वाहतूक सेना
बीआरटी मार्ग काढल्याने अनेक ठिकाणी पंक्चर निर्माण झाली आहेत. येत्या आठ दिवसांत ती दुरुस्त करण्यात येतील. वाहतूक नियोजन विभागासोबत नियोजन करुन पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग पादचारी मार्ग करण्यात येतील.
– उपेंद्र वैद्य, उपभियंता, पथविभाग महापालिका