पुणे -लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी दिवसात विक्रमी 31 हजार 52 जणांनी प्रवास केला. तसेच आजपर्यंतच्या सर्वाधिक 186 विमानांनी टेकऑफ आणि लॅन्डिंग केले.
करोनाकाळात विमानसेवा बंद होती. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये लोहगाव विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीसाठी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेतच विमानांची उड्डाणे होत होती. त्यामुळे प्रवासी संख्या खूपच कमी झाली होती. डिसेंबरमध्ये विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. तेव्हापासून उड्डाणांची संख्या हळूहळू वाढू लागली. करोनापूर्वी लोहगाव विमानतळावरून दिवसाला साधारण: 180 विमानांचे उड्डाण होत होते. या माध्यमातून दररोज 20 ते 25 हजार जण प्रवास करत होते. गेल्या काही महिन्यांत सिंगापूर, बॅंकॉक येथे आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत उड्डाणेदेखील वाढवण्यात आली आहेत. त्यामुळे शिवाय, सध्या सुट्ट्या असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. तसेच आगामी काळात आणखी काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे. लोहगाव विमानतळावर शुक्रवारी 93 विमानांचे आगमन झाले आणि 15 हजार 180 प्रवासी आले.इतक्याच विमानांनी उड्डाण करत 15 हजार 872 प्रवासी आपल्यासोबत नेले.