सातारा – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे यांनी साताऱ्यातील शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयाला शनिवारी भेट दिली. शहर प्रमुख निलेश मोरे यांनी भिडे गुरुजींचे यावेळी स्वागत केले. संभाजी भिडे काही कामानिमित्त शनिवारी साताऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या रविवार पेठेतील संपर्क कार्यालयाला भेट दिली.
कार्यालयाचे विस्तारित आणि भव्य स्वरूप पाहून त्यांनी निलेश मोरे यांचे कौतुक केले. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये हिंदुत्व ऐक्य आणि सर्वधर्मसमभाव याकरिता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानही नेहमीच सक्रिय राहील व हिंदुत्ववादी विचार जपणारे शिंदे सरकार राहिलेच पाहिजे, असे मत भिडे गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे प्रतापगड येथील अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण अत्यंत गोपनीय पद्धतीने सातारा पोलिसांनी हटविल्याबद्दल भिडे गुरुजींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून कौतुक केले. जिल्ह्यामध्ये सामाजिक उपक्रम असो किंवा कोणताही संघटनात्मक कार्यक्रम हिंदुत्व आणि प्रेरित असलेले शिवसैनिक त्याचबरोबर राष्ट्रवाद जोपासणारे कार्यकर्ते ही उद्याच्या समाजाची गरज आहे त्याकरिता अशा विधायक कामांसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहकार्य करण्यासाठी केव्हाही तयार आहे, असे अनौपचारिक गप्पांमध्ये भिडे गुरुजी यांनी स्पष्ट केले.