पुणे(प्रतिनिधी) – पुण्यातील वानवडी, अलंकार हॉलसमोर एका इमारतीत बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत पाच मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याने जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वानवडी परिसरात एका इमारतीत बांधकाम सुरू होते. दोन स्लॅबचे काम पूर्ण होऊन तिसऱ्या स्लॅबचे काम सुरू होते. त्याकरिता सोमवारी सकाळपासून कामगारांनी लाकडी बांबूने स्लॅब बांधून खडी, सिमेंट तिसऱ्या स्लॅब ठिकाणी पोहचवले. मात्र, दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अचानक स्लॅब कोसळून पाच मजूर खाली पडले आणि जखमी झाले.
अग्निशामक दलास याबाबत माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदतकार्य केले.