पुणे – आईला शिवीगाळ केल्याच्या गैरसमजूतीतून सुऱ्याने वार करणाऱ्यास आठ वर्षे सक्तमजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए.टी.वानखेडे यांनी सुनावली. वार केलेल्या व्यक्तीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी खूनाचे कलम वाढविले होते. मात्र, न्यायालयाने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न कलमानुसार शिक्षा सुनावली. दंड भरल्यास त्यापैकी 23 हजार रुपये मयताच्या कुटुंबियांना देण्यात यावेत. दंड न भरल्यास आठ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
सुभाष ऊर्फ बाळा रामचंद्र डंबाळे (वय 44) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. जितेंद्र विश्वनाथ कांबळे (वय 37) यांनीच मृत्यूपूर्व फिर्याद दिली होती. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदर तपासले.
शिक्षेसाठी मयताचा मृत्यूपूर्व जबाब, मयताच्या मुलीची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई व्ही.एस.बसनगार यांनी सरकारी पक्षाला मदत केली. 19 फेब्रुवारी 2027 रोजी ही घटना घडली. आरोपी आणि फिर्यादी बोपोडी येथे एकाच ठिकाणी राहतात.
फिर्यादीची मुलगी त्यांच्या खिशातील पैसे न सांगता घेऊन इमारती खाली गेली. त्यावेळी फिर्यादींनी वरूनच तिला आईवरून शिवीगाळ केली. त्यावेळी आरोपी आईसोबत उभा होता. आईला शिवीगाळ केल्याचा गैरसमज करून त्याने फिर्यादीवर सुऱ्याने वार केले. लोक जमत आहेत, पाहून सुरा तेथे टाकून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.