भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून संघाने पहिला सराव सामना देखील खेळला आहे. त्यांनतर खेळाडू ऑस्ट्रेलियात वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना पाहायला मिळाले आहेत. भारतीय संघाने पहिला सराव सामना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघासोबत खेळला होता आणि त्या सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर आता भारतीय संघाला दुसरा सराव सामना खेळायचा आहे. भारताचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल पहिला सराव सामना खेळले नव्हते. त्यामुळे आता त्या दोघांचीही दुसऱ्या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय संघाच्या डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीची डोकेदुखी कायम आहे. कारण पहिल्या सामन्यात हर्षल पटेल खूपच महागडा ठरला होता.डेथ ओव्हर्समध्ये हर्षल पटेलकडून संघाला चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सराव सामन्यात तो कशी गोलंदाजी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी भारतीय संघाकडे ही शेवटची संधी आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.
भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियन संघात गुरुवारी दुसरा सराव सामना खेळला जाणार आहे. हा सामना पर्थच्या वाका स्टेडियमवर होणार असून तो वाका क्रिकेटच्या युट्युब चॅनलवर थेट लाईव्ह पाहायला मिळणार आहे. हा सामना गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरु होईल. महत्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाला गेलेल्या भारतीय संघातील बऱ्याच खेळाडूंना तेथील खेळपट्टीचा जास्त अनुभव नाही.
विराट कोहली, केएल राहुल, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या उपस्थितीत संघाची फलंदाजी अत्यंत मजबूत भासत आहे. मात्र जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची गोलंदाजी थोडीशी कमजोर वाटत आहे. त्यामुळे या मोठ्या स्पर्धेत गोलंदाजांच्या कौशल्याचा कस लागणार हे मात्र नक्की आहे.