पुणे -राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 37 लाख 38 हजार 131 विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश देण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला 300 रुपये किंमतीचा एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नवीन शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. गणवेशाच्या रंगाबाबत संभ्रम मात्र कायम आहे.
मोफत गणवेश योजना ही इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना लागू आहे. समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन 2023-24 ची केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळाची बैठक नुकतीच झाली. यात या योजनेसाठी 224 कोटी 28 लाख 69 हजार रुपयांच्या निधीला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. मोफत गणवेश योजनेला थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेमधून कायमस्वरूपी वगळण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून एक व राज्य शासनस्तरावरून, एक असे दोन गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात येतील. यासाठी 600 रुपये तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे.
गणवेश कोण देणार याबाबत संभ्रमावस्था
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश देण्याची घोषणा केली होती. स्काऊट गाईडचा विषय शालेय स्तरावर बंधनकारक केला जाईल व यासाठी आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट, असा गणवेश असेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, हा गणवेश कोण देणार याचा संभ्रम मात्र अद्यापही कायम आहे. राज्यातील सर्व महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गणवेश वितरणाबाबत कार्यवाही करावी.
प्रत्येक विद्यार्थ्यांला लाभ द्या…
शाळा व्यवस्थापन समित्यांना अनुदान वितरणास विलंब होऊ नये म्हणून अनुदान जिल्हास्तरावरून थेट तालुकास्तरावर “पीएफएमएस’ प्रणालीच्या माध्यमातून वितरीत करण्यात येणार आहे. एकही पात्र विद्यार्थी मोफत गणवेश वाटप योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षताही घ्या, अशी सूचना समग्र शिक्षा विभागाचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी केली आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विभागामार्फत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी गणवेश अथवा शासनमान्य वसतिगृहातील विद्यार्थ्यांना लाभ दिला जात असल्यास अशा विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
शाळा समिती जबाबदार
प्रत्येक शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन त्यांच्या शाळांमधील गणवेश पात्र लाभार्थ्यांच्या वयोगटानुसार व विद्यार्थ्यांच्या मापानुसार गणवेश खरेदी करुन ते वितरीत करावे लागणार आहे. गणवेशाचा रंग, प्रकार, स्पेशिफिकेशन संदर्भात संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. गणवेशाबाबत कोणतीही तक्रार उपस्थित झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीचीच राहणार आहे.