पुणे – गेल्या 24 तासांत शहरात तब्बल 104 नवीन करोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे करोनाने शहराला जबर विळखा घातल्याचे स्पष्ट झाले असून, उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये 36 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
शहराने आज शंभरीचा आकडा गाठल्यामुळे हा प्रादुर्भाव किती झपाट्याने वाढतो, याच्या अंदाजाने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वाढत्या संख्येने अवघ्या दहा दिवसांत शहरातील करोना बाधितांचा आकडा 598 ने वाढला आहे.
पुणे शहरात दि. 13 एप्रिल रोजी बाधितांची संख्या 278 इतकी होती. मात्र, आज (दि.23) तब्बल 876 वर पोहचली आहे. त्यामध्ये गुरुवारी सर्वाधिक रुग्ण सापडले. मृत्यूची संख्याही 62 वर पोहचली असून, गेल्या 24 तासांत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांत एकूण 571 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये नायडू रुग्णालयात 100, सिम्बॉयसिस-176, यांसह ससून, भारती, पूना, जहांगीर या सर्व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 36 जणांची प्रकृती चिंताजनक असून, ससून रुग्णालयात 25, भारती हॉस्पिटलमध्ये 4, सिम्बायोसिसमध्ये 3, तर दीनानाथ, जहांगीर, हडपसर आणि कर्वेरोड येथील सह्याद्री रुग्णालयात प्रत्येकी 1 रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, आजपर्यंत 130 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
अतिरिक्त निर्बंध शिथिल
बाधित भागात पोलिसांनी लागू केलेले अतिरिक्त निर्बंध गुरुवारी मध्यरात्रीपासून शिथिल करण्यात येणार आहेत. जीवनावश्यक वस्तू तसेच किराणा माल विक्रीची दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत खुली ठेवण्यात येणार आहेत.सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी गुरुवारी हा आदेश रात्री जारी केला. या भागात सोमवारपासून (20 एप्रिल) अतिरिक्त निर्बंध घालण्यात आले होते. आता शहरात जमावबंदी तसेच संचारबंदीचे आदेश 3 मेपर्यंत कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पूर्वभागातील समर्थ, खडक, फरासखाना, कोंढवा, स्वारगेट, बंडगार्डन, दत्तवाडी, येरवडा, खडकी, वानवडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांना अतिरिक्त निर्बंध लागू केले होते.