गुवाहाटी : आसाममध्ये गुरूवारी पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. ते बंदी घालण्यात आलेल्या उल्फा या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. आसाम-अरूणाचल-नागालॅंड सीमा भागांमध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली.
त्याआधारे सीमाभागात असणाऱ्या आसाममधील एका गावात सुरक्षा जवानांनी शोध मोहीम राबवली. त्यावेळी एका घरात दडलेल्या पाच दहशतवाद्यांना शिताफीने पकडण्यात आले. त्यातील दोघे स्फोटके बनवण्यात तज्ञ असल्याचे समजते. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून काही रायफली, पिस्तुल, जिलेटीन, डिटोनेटर्स आदींचा साठा हस्तगत करण्यात आला. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल घरमालकालाही अटक करण्यात आली. संबंधित कारवाई आसाम पोलीस आणि लष्करी जवानांनी संयुक्तपणे केली.