अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहामध्ये पक्षाच्या हायकमांडपेक्षा जनमतालाच प्राधान्य दिले जाईल, असे भारतीय वंशाच्या श्री ठाणेदार यांनी म्हटले आहे. तब्बल 93 टक्के मते मिळवून ठाणेदार मिशीगनच्या प्रतिनिधीगृहामध्ये निवडून गेले आहेत. बेळगावमध्ये लहानाचे मोठे झालेल्या ठाणेदार यांनी सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जवळून बघितलेल्या आहेत. आपल्या सारख्या परदेशी नागरिकावर स्थानिक नागरिकांनी विश्वास दाखवला आहे. त्यांचा विश्वास आपण सार्थ करू, असा विश्वासही ठाणेदार यांनी व्यक्त केला आहे.
ठाणेदार संशोधक बनण्यासाठी 24 वर्षांपूर्वी अमेरिकेत आले होते आणि तेंव्हापासून अमेरिकेतच स्थायिक झाले. “अमेरिकेने मला खूप काही दिले आहे. या देशाचे मी देणे लागातो. त्यामुळेच लोकांची सेवा करण्यासाठीच राजकारणात प्रवेश केला आहे.’ असे ठाणेदार यांनी सांगितले. पूर्वाश्रमीचे संशोधक आणि उद्योगपती असलेल्या ठाणेदार यांनी भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
ठाणेदार यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या 6 प्रतिस्पर्ध्यांच्याविरोधात प्रायमरीमध्ये स्वतःच्या बळावर तब्बल 4.38 लाख डॉलरचे निधी संकलन केले. यापूर्वी 2018 साली झालेल्या मिशीगन प्रांताच्या गव्हर्नर प्रांताच्या निवडणूकीतही ते डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होते. त्यामुळे मिशीगनमध्ये घराघरात त्यांचा परिचय होता. त्यांच्या जनसंपर्कामुळेच त्यांना 93 टक्के इतके मताधिक्य मिळाले.