नवी दिल्ली: जपानमध्ये येत्या वर्षात होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत जर यशस्वी व्हायचे असेल तर प्रो-हॉकीमधील सामने सरावासाठी महत्त्वाचे असले तरी प्रत्येक सामन्याची रणनिती आखणे आवश्यक आहे, असे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग याने व्यक्त केले आहे.
या लीगमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिना हे बलाढ्य संघ आहेत, त्यामुळे भारतीय संघाला चांगला सराव मिळणार आहे. जवळपास पाच महिने चालणाऱ्या एफआयएच प्रो-हॉकी लीगला येत्या 18 जानेवारीला सुरुवात होत असून, त्यात आठ बलाढ्य संघ सहभागी होत आहेत.
ऑलिम्पिकमधील गट साखळीत अव्वल दोन संघांत स्थान मिळवणे, हे प्रमुख ध्येय आहे. भारताच्याच गटात ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिनाचा समावेश असल्याने तयारीसाठी चांगलाच सराव मिळेल, असे मनप्रीत म्हणाला. रशियाला दोन सामन्यांच्या मालिकेत पराभूत करत भारतीय संघ ऑलिम्पिकला पात्र ठरला आहे.
भारताच्या पुरुष संघाचा ऑलिम्पिकला अ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात जागतिक क्रमवारीतील अव्वल संघ ऑस्ट्रेलिया तेसच गतविजेते अर्जेटिना, यजमान जपान, स्पेन न्यूझीलंड यांचा समावेश आहे.