नायब तहसीलदारांना जेसीबीखाली चिरडण्याचा प्रयत्न

नागलवाडी शिवारातून होत होता अनधिकृत वाळू उपसा
नायब तहसीलदार वाघचौरे यांनी दिली फिर्याद
कर्जत (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्‍यातील नागलवाडी शिवारात सीना नदीपात्रातून जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करत असलेल्या वाहनावर कर्जतच्या महसूल विभागाने कारवाई केली. कारवाईत जप्त केलेली वाहने महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने कर्जत तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी नेण्यात येत होती. दरम्यान जेसीबी चालकाने कर्जतचे नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्या अंगावर जेसीबी घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वाघचौरे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सीना नदीपात्रात नागलवाडी, रातंजन, नागापूर या ठिकाणी अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार सी.एम.वाघ यांना मिळाली. त्यानंतर नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांना तहसीलदारांनी नागलवाडी येथे जाऊन सीनापात्रात वाळू उपसा होत आहे का ? हे पाहून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाघचौरे यांनी गौणखनिजचे लिपिक रमेश कांबळे, शिपाई स्वप्निल सुद्रीक हे दोन खासगी मोटारसायकल घेऊन सीना नदीपात्रात गेले. त्यांना नदीपात्रात एक जेसीबी व तीन ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह वाळू उपसा करताना आढळून आले.

मात्र तहसीलचे पथक दिसताच दोन चालकांनी ट्रॅक्‍टर घेऊन पळ काढला. जेसीबी व वाळूने भरलेला एक ट्रॅक्‍टर नदी पात्रात सोडून चालक पळून गेले. या वाहनांचा पंचनामा करून ही वाहने कर्जत तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी कर्मचारी कांबळे व सुद्रीक यांच्या मदतीने घेऊन कर्जतकडे निघाले. वाहने नागलवाडी- मिरजगाव रस्त्यावरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी जप्त करून घेऊन चाललेल्या जेसीबी व ट्रॅक्‍टर या वाहनांना मोटारसायकल आडव्या लावून अडवले. तसेच ट्रॅक्‍टर व जेसीबीवरील कर्मचाऱ्यांना खाली ओढून वाहनाचा ताबा घेतला.

त्यावेळी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी जेसीबीला आडवे उभे राहून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने त्यांच्या अंगावर जेसीबी घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघचौरे यांनी प्रसंगावधान राखत बाजूला उडी घेऊन प्राण वाचवले. हे वाळू तस्कर रातंजनच्या दिशेने ही वाहने घेऊन फरार झाली असे नायब तहसीलदार वाघचौरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीसांनी अमोल काळे, राहूल काळे, स्वप्निल भगत व अन्य एकाविरूध्द सरकारी कामात अडथळा व जीवितास धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)