वेण्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सरसावली तरुणाई

जावळी मित्रमेळा व साथ सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून नदी स्वच्छता
मेढा  (प्रतिनिधी)- जावळी तालुक्‍यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जावळी मित्रमेळा व साथ सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आज मेढा गावात नदी स्वछता प्रकल्प राबविण्यात आला. सध्या संपूर्ण भारतात स्वच्छतेविषयी जनजागृती तसेच स्वच्छताविषयक अभियान मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. यासाठी शासन आणि विविध सामाजिक संस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. मात्र स्वच्छता ही फक्त शासनाची जबाबदारी नसून ती देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हीच जबाबदारी ओळखून जावळी तालुक्‍यातील नदी स्वच्छ करण्यासाठी जावळी मित्रमेळा व साथ सामजिक संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून दि. 1 डिसेंबरला वेण्णा नदी स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला होता. सध्या सर्वत्र अस्वच्छता वाढताना दिसत आहे.

आपल्या घरातील प्लॅस्टिक, थर्माकोल किंवा निसर्गाला बाधा पोहोचविणाऱ्या इतर गोष्टी माणूस बेफिकिरीने ओढ्यात, नदी काठाला टाकताना दिसतात. हा सर्व प्रकारचा कचरा नदीत जमा होतो परिणामी यामुळे नद्या खूप मोठ्या प्रमाणावर दूषित होत आहेत. ज्या नदीचे पाणी माणूस, जनावरे पित असतात तेच पाणी अस्वच्छ झाल्यामुळे त्यांचा परिणाम हा निश्‍चितच मानवी आरोग्यावर होताना दिसत आहे. मानवाने नदीत, ओढ्यात टाकलेला हाच कचरा, प्लॅस्टिक कालांतराने पुन्हा नदीकाठावर येतो आणि नदीकाठी कचऱ्याचे ढिग साचू लागतात. हेच चित्र बदलावे आणि समाजात स्वच्छतेविषयक जनजागृती निर्माण व्हावी यासाठी या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन नदी स्वच्छता प्रकल्पाला सुरुवात केली. मेढा गावात स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नदी स्वच्छतेसाठी दोन्ही संस्थांचे 50 पेक्षा जास्त सदस्य व मेढ्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी केलेल्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी दोन्ही संस्थांचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.