मॉस्को/नवी दिल्ली : युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद (PM Modi holds phone conversation with Putin) साधला. रशियाच्या अध्यक्षीय कार्यालयातून क्रेमलिनच्या हवाल्याने मीडिया रिपोर्टसमध्ये म्हटले आहे की, दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी युक्रेन संकटासह सध्याच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.
नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पीएम मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेला संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा पाठपुरावा करण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.
पीएमओने म्हटले आहे की, एससीओ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर समरकंद येथे झालेल्या बैठकीनंतर, पीएम मोदी आणि पुतिन यांनी ऊर्जा सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण सहकार्य यासह द्विपक्षीय संबंधांच्या अनेक पैलूंचा आढावा घेतला.
Escape Tunnel : ‘बनिहाल-कटरा’ रेल्वे मार्गावरील बोगदा पूर्ण, हा भारतातील….
पीएमओच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदींनी अध्यक्ष पुतिन यांना भारताच्या जी-20 चेअरमनशिप आणि त्याच्या प्रमुख प्राधान्यांबद्दल माहिती दिली. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या भारताच्या अध्यक्षतेखाली दोन्ही देश एकत्र काम करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसेच पीएम मोदी आणि पुतीन यांनी एकमेकांशी नियमित संपर्क ठेवण्याचे मान्य केले.