कैरो – अमेरिकेचा बहुचर्चित दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इजिप्तच्या दौऱ्यावर गेले इजिप्तची राजधानी कैरो येथे ते दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा इजिप्तचा हा पहिलाच दौरा आहे. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह सिसी यांच्या निमंत्रणावरून ते इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी 1997 नंतर इजिप्तला भेट देण्याचीही ही पहिलीच वेळ आहे.
आपल्या इजिप्त भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी इजिप्तचे अध्यक्ष सिसी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्याव्यतिरिक्त इजिप्त सरकारमधील वरिष्ठ मान्यवर, इजिप्तचे प्रमुख नेते आणि भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
इजिप्तचे अध्यक्ष सिसी हे जानेवारी महिन्यात भारतभेटीवर आले होते. तेंव्हा दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध अधिक वृद्धींगत करण्याचे मोदी आणि सिसी या दोन्ही नेत्यांनी मान्य केले होते.
आपल्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी कैरो येथील हेलिओपोलीस राष्ट्रकुल दफनभूमीला भेट देऊन शहिद जवानांना आदरांजली वाहणार आहेत. पहिल्या महायुद्धामध्ये इजिप्त आणि पॅलेस्टाईनमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्करातील 4 हजार सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या 11 व्या शतकातील अल हकीम मशिदीलाही ते भेट देणार आहेत.