नवी दिल्ली – देशामध्ये एवढे द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याची गरज काय आहे असा सवाल करतानाच तुम्ही प्रसारमाध्यमांमध्ये कधी एखाद्या शेतकऱ्याचा अथवा कामगाराचा चेहरा पाहिला आहे का अशी पृच्छाही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल यांची भारत जोडा न्याय यात्रा बिहारमध्ये असून येथील एका रॅलीत बोलताना त्यांनी ही विचारणा केली.
कैमुर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना राहुल म्हणाले माध्यमांमध्ये आमच्या बातम्या दाखवल्या जात नाहीत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना २४ तास दाखवले जाते. काही वेळा नितीश कुमार यांनाही दाखवले जाते. मात्र मला आणि तेजस्वी यादव यांना ते दाखवत नाहीत कारण आम्ही कोणत्या माध्यमाचे मालक नाही. ते श्रीमंतांचे आहे, शेतकरी आणि कामगारांचे नाही. आम्ही या वर्गाचे विचार मांडत असल्यामुळे माध्यमांमध्ये आम्हाला स्थान मिळत नाही. देशात द्वेषाचे एवढे वातावरण का तयार केले जाते आहे असा प्रश्न आम्ही शेतकरी, मजूर, लहान मुले आणि युवक अशा सगळ्यांना विचारला.
त्यावर भीती हे त्याचे कारण असल्याचे उत्तर सगळ्यांनी दिले. भीतीचे कारण अन्याय आहे. दररोज देशाच्या कोणत्या न कोणत्या कोपऱ्यात अन्याय होतो आहे. आर्थिक अन्याय, सामाजिक अन्याय, शेतकऱ्यांवर अन्याय, तरूणांवर अन्याय, महिलांवर अन्याय होतो आहे. हे सगळे होत असताना तुम्ही माध्यमांमध्ये कधी कोणत्या शेतकऱ्याचा किंवा कामगाराचा चेहरा पाहिला आहे का? तुम्ही सगळ्यांनी राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहिला. त्यात कोणी गरीब, शेतकरी किंवा मजुर दिसला का? नाही दिसले कारण ते काम करत होते, उपाशी मरत होते. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भारतातील सगळे श्रीमंत लोक उपस्थित होते. तेथे कोणी गरीब नव्हता अशी टिप्पणी राहुल यांनी केली.
दरम्यान, राहुल यांच्या न्याययात्रेबाबत प्रतिक्रिया देताना हम पक्षाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी म्हणाले की, या लोकांना इंडिया आघाडीच्या नावावर एक बेरोजगारांची आघाडी तयार करण्याचे काम केले आहे.
ज्या दिवशी यांची पाटण्यात बैठक झाली होती त्यात नितीश कुमारही सहभागी होते. पंतप्रधान कोण होणार याची यांना काळजी होती. आता नितीश कुमारही राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएत आले आहेत. ममता बॅनर्जी यांचीही तीच स्थिती आहे. तेजस्वी यादव बेरोजगार झाले आहेत. ते राहुल गांधी यांच्यासोबत जाणार नाहीत तर जाणार कुठे अशी खोचक टिप्पणी मांझी यांनी केली.