पुणे – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व प्रलंबित कामांची व दप्तर तपासणी अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली आहे. त्याचाही अहवालही मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रलंबित कामे व दप्तर दिरंगाईप्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी आता कारवाईच्या रडारवर असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागासंदर्भात सतत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी विभागातील प्रलंबित कामांची तपासणी करण्यासाठी एकूण 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी गेल्या दोन दिवसांत शिक्षण विभागातील प्रलंबित कामे व दप्तर तपासणीचे काम पूर्ण करून, अहवालही दिला आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजाचे वाभाडे काढीत कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. शिक्षण विभागातील स्व-मान्यता यू-डायस प्रणाली, शिक्षकांची थकीत बिले, अन्य कामकाजावर वारंवार तक्रारी येत आहेत.
संबंधितावंर कारवाई होणारच
प्राथमिक शिक्षण विभागाच्या सर्व प्रलंबित कामाची केलेल्या तपासणीचा अहवाल पूर्ण झाला. त्यात काही महत्त्वपूर्ण प्रकरणे हाती आले आहेत. त्यामुळे याप्रकरणी दोषी असणारे व त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येत्या दोन-तीन दिवसांत कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.