पुणे – राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांची मतदार यादीत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. मतदार नाव नोंदणीसाठी जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभागाने याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळांवर सोपविली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची नोंदणी करून मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्याची विनंती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे.
मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळेतील इयता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना निवडणूक साक्षरता मंडळामार्फत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 या कार्यक्रमाची माहिती द्यावी लागणार आहे. निवडणूक साक्षरता मंडळामार्फत 17 ऑक्टोबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत व 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष वय पूर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांचे नवीन मतदार म्हणून नोंदणी अर्ज भरून घेता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे 1 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत 18 वर्षे वय पूर्ण होईल, अशा विद्यार्थ्यांकडूनही नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज भरून घ्यावे लागतील.
निवडणूक साक्षरता बूथ कॅम्प, विविध ऑनलाइन स्पर्धा, असे उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार आहे. शाळेमध्ये नवीन मतदार नोंदणीबाबत ऑनलाइन प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करून जनजागृती करण्यात यावी, असे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इ.मु.काझी यांनी आदेशात नमूद केले आहे.
अर्जाचे नमुने उपलब्ध करून द्यावेत
शाळेने संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाकडून आवश्यक अर्जाचे नमुने उपलब्ध करून घ्यावेत. विद्यार्थ्यांना विहित नाव नोंदणी अर्ज शाळेमध्ये उपलब्ध करून द्यावेत. विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या नाव नोंदणीच्या अर्जांचे संकलन करून शाळेने संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.