नवी दिल्ली – क्रिप्टोकरन्सीने अल्पावधीतच कोट्यधीश बनवल्याच्या अनेक पोस्ट तुम्ही समाजमाध्यमांवर वाचल्या असतील. अनेकांच्या बाबतीत हे खरं असलं तरी क्रिप्टोमध्ये येणारे चढ-उतार सहन करण्याची व त्यातून आर्थिक तोटा झाला तरी तो सोसण्याची क्षमता असल्यासच अशा आभासी चलनात गुंतवणूक करावी असा सल्ला तज्ज्ञमंडळी देत असतात. अशातच आज क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसल्याच पाहायला मिळालं. जवळपास सर्वच क्रिप्टो चलनांमध्ये आज मोठ्या प्रमाणात घट झाली असून सर्वाधिक प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉईनचे दर देखील तब्बल १६ टक्क्यांनी घसरले आहेत.
बिटकॉईनची किंमत आज भारतीय चालनामध्ये ३४ लाखांपर्यंत खाली आली होती. यानंतर यामध्ये सुधारणा होऊन त्याचा दर प्रति बिटकॉईन ३९ लाखांपर्यंत स्थिरावला आहे. विशेष म्हणजे, बिटकॉईनने या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपला सर्वकालीन उच्चांक गाठला होता. 10 नोव्हेंबर रोजी, या डिजिटल चलनाने $69,000 च्या स्तराला स्पर्श केला. परंतु यानंतर घसरण सुरु झाली असून ती आतापर्यंत सुरू आहे.
इथेरियमही घसरला
क्रिप्टो गुंतवणूकदारांचे इथरियम हे दुसऱ्या क्रमांकाचे आवडीचे चलन असून त्याची किंमत शनिवारी १३.७३ टक्क्यांनी घसरून ३,९३४,८६ रुपये झाली. विशेष म्हणजे, इथेरियमने देखील नोव्हेंबरमध्येच त्याचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
इतर प्रमुख डिजिटल चलनातील घसरणीची आकडेवारी पाहिल्यास, Binance Coin 12.59 टक्के, Polkadot 28.23 टक्के, Dodgecoin 19.42 टक्के, Shiba Inu 14.06 टक्के आणि Lite Coin 24.41 टक्क्यांनी घसरले आहे.