पुणे – बिटकॉइन गैरव्यवहारात पोलिसांना सायबर तज्ज्ञ म्हणून मदत करणाऱ्या पंकज घोडे आणि रवींद्रनाथ पाटील यांना बिटकॉइन त्यांच्या खात्यावर वर्ग करुन घेतले. त्यांना याप्रकरणी अटकही झाली आहे. पण, या कटात तत्कालिन पोलीस अधिकारी सहभागी असण्याची शक्यता आहे, असा आरोप बिटकॉइन गुंतवणूकदारांच्या वतीने हेमंत दवे आणि निशा रायसोनी यांनी केला आहे.
सन 2018 मध्ये दत्तवाडी व निगडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याच्या तपासात सहभागी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सरकारने तपासासाठी तज्ज्ञ समिती नेमावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. दवे म्हणाले, “या गुन्ह्यात अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांचा सहभाग असून, त्यांनी लाखो बिटकॉइनचा अपहार केलेला आहे. याबाबत उच्चस्तरीय तज्ज्ञांची चौकशी समिती नेमावी, ब्लॉकचेनमध्ये बिटकॉइन ट्रान्झॅक्शनच्या अचूक तपासासाठी “चेन ऍनालिसिस सॉफ्टवेअरची मदत घ्यावी. रवींद्र पाटील याने केपीएमजी कंपनीसोबत मिळून एकूण किती बिटकॉइन लंपास केले, त्याचा तपास करून कंपनीविरोधातही गुन्हा दाखल करावा. रवींद्र पाटीलची मालमत्ता जप्त करण्यात यावी.’
देशभरात बिटकॉइनचे 42 गुन्हे दाखल
भारद्वाज बंधूंनी केलेल्या बिटकॉइन चोरीची व्याप्ती जगभरात असून, त्यांच्यावर पुणे, नांदेड, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नागपूर, कोल्हापूर येथे 12 गुन्ह्यांची नोंद आहे. तर, विविध राज्यांत अशा एकूण 42 गुन्ह्यांची नोंद आहे. या चोरीच्या तक्रारीची दखल सक्तवुसली संचलनालय-मुंबई (ईडी) यांनी घेतली आहे. मनी लॉन्ड्रिंगचा सुरू आहे. त्यांनी या गुन्ह्याचे मूल्यांकन 20 हजार कोटी रुपये केले आहे. भारद्वाज बंधूंनी दहा बिटकॉइनच्या मोबदल्यात 18 बिटकॉइन 18 महिन्यांत परत देण्याचा करार करत गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे.
पाटील यांचा जामीन फेटाळला
याप्रकरणात रवींद्रनाथ पाटील यांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला. त्यामुळे पाटील यांनी आता सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पंकज घोडे आणि रवींद्रनाथ पाटील यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनी या प्रकरणातील डिजिटल डेटाचा गैरवापर केला आहे, असे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे.