पुणे – बिटकॉइन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलनातून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देशभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यांची सुनावणी आता एकत्रितपणे दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयात होणार आहे.
मुख्य न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या खंडपीठातील न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी हा निकाल दिला. त्यामुळे या गुन्ह्यातील सर्व प्रकरणे सीबीआयकडे हस्तांतरित झाली आहे. तसेच सीबीआयला पुन्हा या गुन्ह्याचा नव्याने तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. गुन्ह्याच्या व्याप्ती वाढल्याने आरोपींवर देशभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना देशभरातील विविध न्यायालयात हजर करण्यात आले होते.
प्रत्येक न्यायालयात स्वतंत्रपणे न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्याऐवजी खटला एकत्रितपणे एकाच न्यायालयात चालविण्याची मागणी आरोपींनी केली होती. त्याबाबतचा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. काही आरोपींच्यावतीने अॅड. प्रतीक राजोपाध्ये यांनी युक्तिवाद केला. हा अर्ज निकाली काढत न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेण्याचा आदेश दिला.
सक्तवसुली अंमलबजावणी संचलनायाकडून (ईडी) या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज आणि अजय भारद्वाज (दोघेही रा. दिल्ली) यांच्याविरोधात पुण्यातील दत्तवाडी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यासह निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) आणि संगणक तज्ज्ञ पंकज घोडे (रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
पाटील याने मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी स्वत:च्या व त्याच्याशी इतर संबंधित व्यक्तीच्या वॉलेटवर घेतले असल्याचे दिसून आले आहे. त्याच्याकडून आतापर्यंत चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे सहा कोटी रुपये किंमतीची विविध क्रिप्टोकरन्सी जप्त करण्यात आली आहे. पाटील आणि घोडे यांनी आरोपींच्या वॉलेटमधील आभासी चलन स्वत:च्या खात्यात वळविल्याचे तपासात निष्पन्न झाले.