पुणे – क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी युवकाची 30 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी लोणीकाळभोर येथील 37 वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना एरिन आणि रिकी नावाच्या व्यक्तींनी व्हॉट्स ऍपवर मेसेज पाठवला.
क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल, असे सांगून फिर्यादींना यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केले. त्यावेळी दोघांनी फिर्यादींना आपण टेलिग्रामध्ये चांगल्या पदावर काम करत असल्याची बतावणी केली. “गुंतवणूक केल्यास प्रचंड पैसे आहे,’ असे भासवून फिर्यादी यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर बनावट वेबसाइटच्या आधारे नफा मिळत असल्याचे भासवून त्यांना एकूण 30 लाख 87 हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले.
मात्र, प्रत्यक्षात ते पैसे विड्रॉ केले असता त्यामध्ये अडचणी येत होत्या. फिर्यादी यांनी विचारणा केली असता पैसे काढण्यासाठी आणखी पैसे भरावे लागतील असा तगादा लावला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच एरिन आणि रिकी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल पाटील या करत आहेत.