पुणे (संजय कडू) – क्रिप्टो करन्सीच्या 2018 मधील प्रकरणात सायबर तज्ज्ञांनी हडप केलेल्या 237 बिटकॉइनचा तपास लावण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींच्या जबाबातील नाहीसे झालेल्या आणखी 900 बिटकॉइनचा तपास सुरू असल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.
बिटकॉइन गैरव्यवहाराचा एप्रिल 2021मध्ये झालेल्या संशयास्पद तपासाचा पुणे पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला आहे. त्यानुसार पोलिसांनी सुत्रधार पंकज घोडे (38) आणि रविंद्रनाथ पाटील (45) या आरोपींना अटक केली आहे. पाटील हा जम्मू काश्मिर केडरचा माजी आयपीएस अधिकारी होता. त्याने नियुक्तीनंतर दोनच वर्षात स्वेच्छा निवृत्ती घेत सायबर तज्ज्ञ म्हणून काम सुरू केले. तो पोलिसांना अनेक तपासात सायबर तज्ज्ञ म्हणून मदत करीत असे. लाखो डॉलर्सच्या बिटकॉइनच्या फसव्या योजनेच्या 2018 मधील घटनेच्या तपासात या जोडीने मदत केली होती.
घोडे आणि पाटील यांनी यातील क्रिप्टो करन्सी आपल्या आणि “संबींधतां’च्या खात्यात वर्ग केली. बिटकॉइन प्रकरणात पोलिसांनी 2018 मध्ये 241.46 बिटकॉइन, 452 बिटकॉइन कॅश युनिट आणि 94 इथेरीयम युनिट घोडे आणि पाटील यांच्या मदतीने जप्त केले होते. आजच्या बाजारभावाप्रमाणे एका बिटकॉइनची किंमत 35 लाख रुपये आहे. तर एका बिटकॉइन कॅश युनिटची किंमत 29 हजार आहे. एका इथेरीयमची किंमत अडीच लाख आहे.
तपास पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, 2018च्या प्रकरणातील जप्त बिटकॉइनमधील पाटील याच्या वॉलेटशी संबंधीत 237 बिटकॉइनचा आम्ही छडा लावला आहे. तपासात पाटील क्रिप्टो ट्रेडींगमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी एकून सहा कोटी रुपयांची क्रिप्टो करन्सी जप्त केली आहे. इथेरीयम, रिपल आणि अन्य चार चलनाचा त्यात समावेश आहे. घोडेने 2018 मध्ये सादर केलेल्या अहवालातील तपासात विसंगती असणाऱ्या 900 बिटकॉइनचा आम्ही तपास करत आहोत. त्याची किंमत आजच्या बाजारणावाने 320 कोटीच्या घरात आहे. 2018च्या फसवणूक प्रकरणात 17 जणांना अटक केली होती. त्या प्रकरणाचा मास्टरमाईंड अमित आणि विवेक भारद्वाज हे मास्टर माईंड आहेत. अमित भारद्वाजला 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला. या भावंडांवर देशभरात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. भारद्वाज आणि त्याच्या सहकाऱ्यांकडे 87 हजार बिटकॉइन होते त्याची आजच्या
बाजारभावाने किंमत 31 हजार कोटी रुपये होती.
दरम्यान, रविंद्रनाथ पाटील हॉंगकॉंग येथील एका कंपनीत संचालक पदावर कार्यरत होता. यानंतर तो कंपनीचा भागीदार झाला. त्याच्या संदर्भातील गुन्ह्याची माहिती कंपनीने सायबर पोलिसांकडून घेतली आहे. यानंतर त्याच्यावर चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
व्यापक कट उलगडणार…
2018 मधील या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची आम्ही चौकशी केली आहे. पाटील आणि घोडे यांच्या या लबाडीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले का? काही अधिकाऱ्यांनी घोडे आणि पाटीलला मदत केली का? याचा तपास सुरू असून त्यातून या बिटकॉइनच्या रेशमी जाळ्याचे शुक्लकाष्ठ सुटण्यास मदत होणार आहे. एक व्यापक कट त्यामुळे उघड होऊ शकतो, असे तपासात सहभागी असणाऱ्या अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.