जीवनावश्यक नव्या गोष्टी शिका : तज्ज्ञांचा सल्ला
पुणे – करोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात, विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये उत्कंठा प्रलंबित विद्यापीठ परीक्षांची असून तोपर्यंत परीक्षेची वाट पाहण्यापेक्षा, त्याची तयारी न विसरता करीत जीवनावश्यक नव्या गोष्टी शिका, असा सल्ला शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग या परीक्षांची आणि नव्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक तयार करत असून करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची आणि सुरक्षित रित्या परीक्षा होण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी नियुक्त समितीने शिफारशी दिल्या असून स्थानिक परिस्थितीवर बऱ्याच गोष्टी सोडल्या आहेत.
परीक्षा, नोकऱ्या,प्लेसमेंट आणि एकूणच भवितव्याबद्दल विद्यार्थी चिंताक्रांत आहेत. आम्ही ऑनलाइन अध्यापन आणि परीक्षा घेण्याची तयारी केली आहे. अशा वेळी निर्णय होईपर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यासलेल्या गोष्टी विसरू नये. वेळ चांगला जाण्यासाठी अभ्यासक्रम, करियरशी सुसंगत नव्या गोष्टी शिकणे योग्य राहील. अर्थव्यवस्थेतील घसरण लक्षात घेता नवे रोजगार कितपत उपलब्ध होतील, याविषयी आताच सांगता येणार नाही.
– डॉ. सचिन वेर्णेकर, संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍन्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हेलपमेंट (आयएमइडी)
परीक्षा कधी होणार यावरून विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. लॉकडाऊन उठण्याची वाट पाहिली जात आहे. डिजिटल व्यवस्था करून परीक्षा घेण्याची तयारी ठेवावी, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले असले तरी सर्वत्र तशी तयारी नाही. विद्यार्थी एका गावात नसून विखुरलेले आहेत. सर्वत्र इंटरनेट सुविधा चांगली असेलच असे नाही. अभियांत्रिकी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी गणितीय समीकरणे, ग्राफ, आकडेमोड करणे गरजेचे असून ते सर्व ऑनलाइन करणे जमले पाहिजे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने परीक्षा होणे योग्य ठरेल.
– डॉ. आनंद भालेराव, प्राचार्य, भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय
विद्यापीठ अनुदान आयोगाकडे काही शिफारशी आल्या असल्या तरी शिक्षण आणि परीक्षा याबाबत राज्य सरकारचे निर्णय काय असतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. आम्ही त्या निर्णयांची प्रतीक्षा करीत आहोत.
– डॉ. पी. ए. इनामदार, अध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी