मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन फुलं वाहिल्यानंतर राज्यात एकच गोंधळ निर्माण झाला होता. सत्ताधारी आणि विरोधकांनी यावर आरोप-प्रत्यारोप केले होते. त्यानंतर आता याच मुद्दावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे.
अहमदनगरमध्ये रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या कृतीवर बोलताना ,“औरंगजेबाचा उदोउदो करण्याची भूमिका योग्य नाही. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देणं आमच्या दलित समाजाला आवडलेलं नाही. मुस्लीम समाजातील तरुणांनीही औरंगजेबाचा उदोउदो करून हिंदू समाजात जाणीवपूर्वक रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही मुस्लिमांविरोधात अजिबात नाही. त्यामुळे मुद्दाम काहीतरी खोड काढण्याचा प्रयत्न कुणी करू नये. “असे त्यांनी यावेळी म्हटले.
तसेच “औरंगजेब आता गेला आहे. औरंगजेब इथला नाही. भारतातील सर्व मुसलमान पूर्वी हिंदूच होते. ते हिंदू होण्यापूर्वी सर्वजण बौद्ध होते. बौद्ध होण्यापूर्वी सर्व वैदिक होते. त्यामुळे हे बाहेरून आलेले मुसलमान नाहीत. म्हणूनच हिंदूंनी मुसलमानांना समजून घेणं आवश्यक आहे आणि मुसलमानांनीही हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेणं आवश्यक आहे,” असे स्पष्टपणे मत रामदास आठवलेंनी यावेळी मांडले.
पुढे बोलताना, “आमचं सर्व मुस्लिमांना हेच सांगणं आहे की, काँग्रेसवाले आणि विरोधीपक्षावाले तुम्हाला भडकावत आहेत. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांचं ऐकू नये. मुस्लिमांनी आमच्याबरोबर राहिलं पाहिजे. मागील निवडणुकीचा सर्व्हे आहे की, जवळपास ८ टक्के मुसलमानांची मतं भाजपाला मिळाली होती. आता पुढील निवडणुकीत आमचं आवाहन आहे की, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. मुस्लीम समाजाने आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे.”असे आवाहन देखील यावेळी आठवले यांनी केले.
“भाजपाचा मुस्लीम विभाग (विंग) आहे आणि माझ्या पक्षाचाही मुस्लीम विभाग आहे. आम्ही आमच्या पक्षात मुस्लिमांना आणण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे अशा दंगली महाराष्ट्रात आणि इतरत्र होऊ नये. तसेच विनाकारण कुणीही वाद निर्माण करू नये असं माझं मत आहे,” असेही रामदास आठवलेंनी यावेळी नमूद केले.