शिर्डी, {राजेंद्र भुजबळ} – शिर्डी लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच पेटले असून, महायुती, महविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे नेते शिर्डीत ठाण मांडून बसले आहेत. अशातच महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांच्यासाठी मुख्यमंत्री आठवड्यातून दोनवेळा आले आहे.
मंत्री दादा भुसे यांनी शिर्डी मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी व बैठकांचा जोर वाढविला आहे. त्यालाच आव्हानात्मक उत्तर म्हणून महाविकास आघाडीकडून संजय राऊत यांनीही सभेतून आपली ताकद दाखवून दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्यभरातील पदाधिकारी यांनीही घरोघरी जाऊन प्रचारात आघाडी घेतली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघातील निवडणुकीत किंगमेकरची मुख्य भूमिका ही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात व वंचित बहुजन आघाडीचे अॅड प्रकाश आंबेडकर या तीन नेत्यांची असणार आहे. त्यामध्ये विशेष करून शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ असून शिर्डी हा त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
याठिकाणी ते विधानसभा निवडणुकीत सलग पाचवेळा निवडून आले आहेत. विशेष बाब म्हणजे शिर्डी नगरपरिषद, राहाता नगरपरिषद या दोनही ठिकाणी विखे पाटील यांची सत्ता आहे. ऐंशी टक्क्यांवरून जास्त ग्रामपंचायतीमध्ये विखे पाटलांची सत्ता आहे,त्यामुळे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा. सदाशिव लोखंडे यांना निवडूनआणण्यामध्ये त्यांची मुख्य भूमिका होती. लोखंडे यांच्या विजयामध्ये ते खरे किंगमेकर ठरले होते.
आता महायुती व महाविकास आघाडी यांच्यात खरी लढत असली तरी आमदार बाळासाहेब थोरात हे या लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते असून ते संगमनेर विधानसभा मतदा संघातून सलग सातवेळा निवडून आले आहेत. विशेष बाब म्हणजे ते विधानसभेतील काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते आहे. त्यामुळे त्यांचाही दबदबा या मतदार संघात मोठा आहे.
त्यांनी आपली यंत्रणा अलर्ट केली असून महविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे. या दोनही दिग्गज किंगमेकर असणाऱ्या नेत्यांच्या विरोधात कडवी झुंज अॅड. प्रकाश आंबेडकर हे देत आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात आजवरच्या काळात पहिल्यांदाच वंचित आघाडीने उत्कर्षा रूपवते यांच्या रूपाने एक महिला उमेदवार देऊन निवडणुकीत मोठी चुरस निर्माण करून दिली आहे. अर्थात मतदानाला अवघे चौदा दिवस उरले असून, जो तो आपापल्या परीने प्रचारात ताकद अजमावत असून, या तीनही दिग्गज नेत्यांमध्ये नेमकी कोण किंगमेकर ठरणार हे ४ जूनलाच कळणार आहे.