जे गुणेंद्रिय धोकोटी । देह धातूंची त्रिकुटी । पांचमेळावा वोखटी । दारुण हे ।। 1069 ।।
परी इये देहीं असतां । जो नयेचि आपणया घाता । आणि शेखीं पंडुसुता । तेथेंचि मिळे ।। 1072 ।। अध्याय 13 वा
संत ज्ञानेश्वर महाराज देहाबद्दल सांगत आहेत. माऊली म्हणतात, हा देह तीन गुण आणि इंद्रिये ठेवण्याची पोतडी आहे. हा वात, पित्त व कफ या तीन धातूंचा समूह आहे. हा देह भयंकर आणि वाईट अशा पंचमहाभूतांचा मेळावा आहे. हा देह म्हणजे पांच नांग्यांची इंगळी पाच प्रकारची आग आहे. जीवरूप सिंहाला हा देह हरणांचे घरच सापडले आहे.
याप्रमाणे या देहात जीवरूपी सिंह बद्ध झाला असूनही “मी नित्य, शुद्ध, बद्धमुक्त आहे’ या बुद्धीची नखे या देहाच्या अनित्यत्वाच्या पोटात कोणीच का खुपशीत नाही, ते कळत नाही. अनित्य देहाचे विदारण करून “मी’ नित्य आहे, या विचाराने तो मोकळेपणाचा आनंद भोगण्याकरिता देहाबाहेर का पडत नाही, हे कळत नाही.
तथापि अर्जुना, या देहात अजूनही आपला घात होण्याच्या अवस्थेपर्यंत येत नाही, देहाशी तादात्म्य ठेवून बद्धतेमुळे, जन्म-मरणाच्या दु:खामुळे व नरकाच्या यातनेमुळे आत्मघात होऊ देत नाही. तो देहपात झाल्यानंतर त्या आत्म्यातच एकरूप होतो आणि वदेह मुक्तीला प्राप्त होते..