भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई?
नवी दिल्ली, ता. 13 – सर्व प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रें पाठवून तात्पुरते पंतप्रधानपदावरून सेवानिवृत्त होण्याचा आपला मानस पं. नेहरूंनी कळविला आहे व त्यांची मते मागविली असल्याचे कळते. प्रदेश कॉंग्रेस समित्यांच्या अध्यक्षांनी धाडलेल्या पत्राचा जो मसुदा प्रसिद्ध झाला आहे तशाच मजकुराची ही पत्रे आहेत असे कळते.
पं. नेहरूंच्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून श्री. बा. गं. खेर यांचे नाव आज येथे घेतले जात आहे, तर पंतप्रधानपदासाठी मुंबईचे मुख्यमंत्री श्री. मोरारजीभाई देसाई यांचेच नाव सतत ऐकू येत आहे.
मंगळ ग्रहावरील दोघी सुस्वरूप तरुणी
पॅरिस, ता. 13 – फ्रेंच ऍटलांटिक किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या ओलोरन या छोट्याशा बेटावर गेल्यावर तेथे मंगळावरून आलेल्या दोन सुस्वरूप तरुणी भेटल्याची बातमी एका फ्रेंच वसाहतीतून रजेवर येथे आलेल्या एका शाळामास्तराने दिली आहे.
सदर तरुणीची उंची सुमारे पाच फूट सात इंच असून त्यांनी चामडी शिरस्त्राणे, हातमोजे व बुट परिधान केले होते, असे तो म्हणाला. मराठा इतिहासाचे फारसी दफ्तर
दुसरा खंड प्रसिद्ध झाला
मुंबई, ता. 13 – मराठा इतिहासाचे फारसी दफ्तर या ग्रंथमालेतील “शिंदे- दिल्लीचे राजप्रतिनिधी’ हा दुसरा खंड प्रसिद्ध झाला आहे. या द्वितीय खंडात हैद्राबादच्या “सालरजंग साधनापैकी काही निवडक भाग आणि मुंबईच्या सेक्रेटरीएट रेकॉर्डस् ऑफिससाठी मिळवण्यात आलेले फारसी साधने यांचा समावेश झाला असून सर्व कागदपत्रे सन 1787 आणि 1789-91 साला संबंधीचे आहेत.
ईशान्यकडे दृढमूल झालेली व गंगा किनाऱ्यापर्यंत हातपाय पसरून बसलेली ब्रिटीश सत्ता दिल्लीवरही आपले वर्चस्व गाजवील हे महादजी शिंदे यांनी ओळखले होते व त्यांनी मोगल साम्राज्याची व्यवस्था पाहण्यासाठी बादशहाकडून आलेले निमंत्रण स्वीकारले.
त्यांनी हाती घेतलेल्या या नवीन जबाबदारीमुळे त्यांना अनेक शत्रू निर्माण झाले. इतकेच नव्हे तर हे सर्व त्याच्याविरुद्ध एकत्र झाले. परंतु अखेर त्यांना शिंद्यांच्यापुढे हार खावी लागली. हा सर्व इतिहास व त्यावेळचे उत्तरेकडील राजकारण या खंडात आहे.